मोदी यांना झाली आठवले यांची आठवण

वृत्तसंस्था
रविवार, 18 मार्च 2018

रिपब्लिकन पक्षाच्या अधिवेशनासाठी खास संदेश

रिपब्लिकन पक्षाच्या अधिवेशनासाठी खास संदेश

नवी दिल्ली: सत्तारूढ भाजप आघाडीची (एनडीए) स्थिती "एक एक पान लागले गळावया,' अशी झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सावध पवित्रा घेतला असून, संसदेत संख्याबळाने सर्वांत लहान पक्षांतील एक असलेल्या रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनासाठी मोदींनी खास संदेश पाठविला. रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष व केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले हे 2019 नंतरही आपले मंत्रिमंडळातील सहकारी म्हणून कार्यरत असतील, असे भाकीत वर्तवून गृहमंत्री राजनाथसिंह यांनी पुढच्या सार्वत्रिक निवडणुकाही नरेंद्र मोदीप्रणीत भाजपच जिंकणार, असा विश्‍वास व्यक्त केला.

रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन तालकटोरा स्टेडियमवर नुकतेच झाले. यासाठी हजारो कार्यकर्ते हजर होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयजयकाराने स्टेडियम दणाणून गेले होते. राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर, राष्ट्रीय महासचिव मोहनलाल पाटील, सीमा आठवले, माजी आमदार अनिल गोंडाने, शीलाताई गांगुर्डे, अनिल बाबा, मिथिलेश पांडे, मिर्जा बेग, वेंकटस्वामी आदी पदाधिकारी हजर होते.
भाजपला 2014 मध्ये स्पष्ट बहुमत मिळाल्यावर भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला फारसा भाव न देण्याचे धोरण मोदी-अमित शहा यांनी ठेवले होते. शरद यादव बाहेर पडल्यापासून रिक्त झालेले "एनडीए'चे समन्वयकपद अजूनही भरले गेलेले नाही. मात्र, आता भाजप आघाडीतून चंद्राबाबू नायडू बाहेर पडल्यावर व उत्तर प्रदेशाच्या "गोरखपुरी' दणक्‍यानंतर पक्षनेतृत्वाला जाग आल्याचे दिसते. आठवले यांना "एनडीए' बैठकीत बोलण्यासाठी जेमतेम काही मिनिटे दिली जात असत. मात्र, त्यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन पक्षाने उत्तर भारतात; विशेषतः उत्तर प्रदेश व दिल्ली व हरियानात हातपाय पसरण्यास प्रारंभ केल्याचे चित्र आहे. कालच्या अधिवेशनाला आलेल्यांत महाराष्ट्राइतकेच उत्तरेतील कार्यकर्तेही होते. आठवले हे संसदेतील सर्वांत लहान पक्षांचे प्रतिनिधित्व करीत असले, तरी भाजप आघाडीतून आता एकही गळती होऊ नये यासाठी दक्ष झालेल्या मोदींनी त्यांना स्वतः शुभेच्छा संदेश पाठविला.

अध्यक्षपदी फेरनिवड
या अधिवेशनात आठवले यांची रिपब्लिकन पक्षाच्या अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली व सदस्य नोंदणी मोहिमेचीही सुरवात करण्यात आली. आठवले यांनी इंदू मिलच्या जागेवरील प्रस्तावित स्मारक, दिल्लीत जनपथावरील बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन व अभ्यास केंद्र व 26 अलीपूर रस्त्यावरील प्रस्तावित स्मारक ही कामे मोदी सरकारसाठी मोठी उपलब्धी असल्याचे नमूद केले.

Web Title: new delhi news narendra modi ramdas athawale