पुस्तकातून वगळला 'मुस्लिमविरोधी' शब्द

वृत्तसंस्था
रविवार, 25 मार्च 2018

अभ्यासक्रमाचे पुनर्मूल्यांकन करणे हे सतत चालू असणारी प्रक्रिया आहे. प्रत्येक पुनर्प्रकाशनापूर्वी आमच्याकडे आलेल्या प्रतिक्रिया विचारात घेऊन बदल करतो. तसेच, चालू घडामोडी लक्षात घेऊन माहिती अद्ययावत केली जाते. त्यानुसार आम्ही पुस्तकात इतर बदलही केले आहेत. यात नोटाबंदी, डिजिटल साक्षरता, वस्तू व सेवा कर (जीएसटी) यांचा समावेश करून अद्ययावत आकडेवारीचा समावेश केला आहे, असे "एनसीईआरटी'च्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

"एनसीईआरटी'च्या बारावीच्या पुस्तकात बदल

नवी दिल्ली: नॅशनल काउंसिल फॉर एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग (एनसीईआरटी) च्या बारावीच्या "पॉलिटिकल सायन्स'च्या पुस्तकातून "अँटी मुस्लिम राईट्‌स इन गुजरात' हा शब्द वगळला आहे. त्याऐवजी "गुजरात रायट्‌स' हा शब्द आता वापरण्यात येणार आहे.

गुजरातमध्ये 2002मध्ये झालेल्या दंगलीची माहिती देणारा धडा "पॉलिटिक्‍स इन इंडिया सिंस इंडिपेंडंस' या शीर्षकाने आहे. यातील उपशीर्षकात बदल करून "अँटी मुस्लिम राईट्‌स इन गुजरात'ऐवजी आता "गुजरात रायट्‌स' हा शब्द येणार आहे. हा व सुरवातीच्या ओळीतील बदलाशिवाय या धड्यातील माहितीत अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही. या पुस्तकातील पान क्र. 187 वर दंगलीबाबत जो परिच्छेद प्रसिद्ध केला आहे, त्याच्या शीर्षकात "मुस्लिमविरोधी दंगल'ऐवजी "गुजरात दंगल' असा बदल केला असला, तरी याच परिच्छेदात 1984मध्ये देशात झालेल्या दंगलीला "शीखविरोधी' म्हटले आहे.

नव्या पुस्तकातील बदल
नव्या पुस्तकातील धड्याच्या उताऱ्यात दोन बदल केले आहेत. शीर्षकाबरोबरच उताऱ्यातील पहिल्या शब्दातून "मुस्लिम' शब्दही हटविला आहे. यापूर्वी यात "फेब्रुवारी-मार्च 2002मध्ये गुजरातमध्ये मुस्लिमांविरोधात मोठा हिंसाचार झाला होता,' असे वाक्‍य होते. पण, आता यात बदल करून "फेब्रुवारी-मार्च 2002मध्ये गुजरातमध्ये मोठा हिंसाचार झाला होता,' असे वाक्‍य तयार केले आहे. जुने पुस्तक 2007मध्ये प्रकाशित केले होते. त्या वेळी देशात कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार सत्तेवर होते.

Web Title: new delhi news ncert book muslim word