वेगळ्या आकारांच्या नोटांमुळे राज्यसभेत गोंधळ

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 9 ऑगस्ट 2017

आक्रमक काँग्रस सदस्यांमुळे राज्यसभा दिवसभरासाठी तहकूब

नवी दिल्ली: एकाच मूल्याच्या पण भिन्न भिन्न आकाराच्या 500 रुपयांच्या चलनी नोटांची छपाई रिझर्व्ह बॅंकेकडून होत असल्याच्या मुद्यावरून राज्यसभा आज दणाणून गेली. काँग्रसने हा शतकातील सर्वांत मोठा गैरव्यवहार असल्याचा आरोप करीत सातत्याने गदारोळ केला. त्यामुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

आक्रमक काँग्रस सदस्यांमुळे राज्यसभा दिवसभरासाठी तहकूब

नवी दिल्ली: एकाच मूल्याच्या पण भिन्न भिन्न आकाराच्या 500 रुपयांच्या चलनी नोटांची छपाई रिझर्व्ह बॅंकेकडून होत असल्याच्या मुद्यावरून राज्यसभा आज दणाणून गेली. काँग्रसने हा शतकातील सर्वांत मोठा गैरव्यवहार असल्याचा आरोप करीत सातत्याने गदारोळ केला. त्यामुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

चालू अधिवेशनातील त्यातही उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या कार्यकालात ते स्वतः येतात त्या प्रश्‍नोत्तर कामकाजाचे हे अखेरचे दोन दिवस आहेत. कारण उद्या (ता. 9) पंतप्रधानांच्या कल्पनेनुसार ऑगस्ट क्रांतीच्या 75 व्या वर्षानिमित्त संसदेत चर्चा होणार आहे. गुरुवारी (ता. 10) अन्सारी यांना निरोप समारंभ होईल. त्यामुळे आज किमान प्रश्‍नोत्तराचा तास चालवावा अशी त्यांची इच्छा होती. पण काँग्रसने गोंधळ घातल्याने संपूर्ण दिवसाचेच कामकाज पाण्यात गेले. सकाळी अकरा ते दुपारी दोन वाजून पस्तीस मिनिटे या काळात तब्बल सहा वेळा कामकाज तहकूब करूनही काँग्रसने गोंधळ कायम ठेवल्याने आज कामकाजच झाले नाही.

कामकाजाच्या सुरवातीलाच काँग्रसचे कपिल सिब्बल यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित करून हा प्रकार समोर आणला. ते म्हणाले, की रिझर्व्ह बॅंक दोन प्रकारच्या नोटा छापत आहे. या 500 व 2000 च्याही नोटा वेगवेगळ्या आकाराच्या व डिझाइनच्या आहेत. त्यांचे मूल्य एकच असले तरी आकार वेगळा आहे. गुजरातमधील भाजप कार्यकर्त्यांकडेच या वेगवेगळ्या नोटा आढळल्याचे सांगून सिब्बल यांनी त्याचा संबंध थेट राज्यसभा निवडणुकीशी जोडला व हा गंभीर प्रकार असल्याचे सांगितले.
दुपारी त्यांच्या शेजारीच बसलेले माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना त्यांनी त्या नोटा दाखविताच चिदंबरम बराच वेळ दोन्ही नोटा निरखत होते. त्यांनीही या प्रकाराला दुजोरा दिला. काँग्रसनेच नव्हे तर डेरेक ओब्रायन, शरद यादव, नरेश आगरवाल आदी विरोधी नेत्यांनीही या संशयास्पद प्रकाराबाबत अर्थमंत्री अरुण जेटली यांनी खुलासा करावा, असा आग्रह धरला. हा शतकातील सर्वांत मोठा गैरव्यवहार असून, या सरकारला पाच मिनिटेही सत्तेवर राहण्याचा अधिकार उरला नसल्याचे विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी सांगितले.

जेटली म्हणाले, की हे कोणतेही कागद सभागृहात फडकावून विरोधक गोंधळ करतात व शून्य प्रहर वाया घालवतात. अशा बेजबाबदार पद्धतीने औचित्याचे मुद्दे मांडण्यास परवानगीच देऊ नये. विरोधक शून्य प्रहराचा दुरुपयोग करत असल्याचा आरोप जेटली यांनी करताच काँग्रस सदस्य घोषणाबाजी करत अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत उतरल्याने कामकाज चालण्याची शक्‍यता संपली.

आजी माजी उपराष्ट्रपती सख्खे शेजारी !
गेली 10 वर्षे उपराष्ट्रपतिपदी असलेले हमीद अन्सारी यांची शिस्त व वक्तशीरपणा पाहता ते 10 तारखेला रात्रीच भारताचे सरकारी निवासस्थान रिकामे करून नवीन बंगल्यात राहायला जातील. त्यांना "31 अब्दुल कलाम रस्ता' हा बंगला देण्यात आला आहे. या पदावर निवडून आलेले एम. वेंकय्या नायडू सध्या त्याच्या बरोबर समोर म्हणजे "30 अब्दुल कलाम रस्ता' येथे राहत आहेत. नवीन निवासस्थान तयार होण्यास किमान 2-3 दिवस लागणार असल्याने नायडू हे 11 तारखेला लगेच उपराष्ट्रपती निवासस्थानी जाऊ शकणार नाहीत. तामुळे आजी व माजी उपराष्ट्रपती हे किमान तीन दिवस एकमेकांचे सख्खे शेजारी असतील.

Web Title: new delhi news note size issue and rajya sabha