मोदी चार जुलैपासून इस्राईल दौऱ्यावर

मोदी चार जुलैपासून इस्राईल दौऱ्यावर

भेट देणारे पहिले पंतप्रधान; संबंध दृढ करण्यावर भर

नवी दिल्ली: भारत-इस्राईल राजनैतिक संबंधांच्या रौप्यमहोत्सवी वर्षाचे निमित्त साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी चार ते सहा जुलै दरम्यान इस्राईलच्या भेटीवर जाणार आहेत. इस्राईलला भेट देणारे ते पहिले पंतप्रधान असतील. या भेटीत द्विपक्षीय संबंधांच्या विस्तारीकरणाबरोबरच ते सखोल करण्यावर भर राहील. संरक्षणविषयक सहकार्याच्या मुद्द्यावरही या भेटीत भर असला तरी यासंदर्भात काही करार होण्याच्या शक्‍यतेबद्दल मौन बाळगण्यात येत आहे.

जुलैच्या पहिल्या आठवड्यात इस्राईल आणि त्याला लागूनच सात व आठ जुलै रोजी जर्मनीतील हॅंबर्ग येथे "जी-20' शिखर परिषदेसाठी मोदी जाणार आहेत. यामध्ये त्यांची इस्राईलची भेट वैशिष्ट्यपूर्ण असेल. कारण इस्राईलला मान्यता दिल्यानंतर त्या देशाबरोबर पूर्ण स्वरूपाचे राजनैतिक संबंध प्रस्थापित करण्यास पंचवीस वर्षे पूर्ण होत आहेत. भारताने 1992 मध्ये प्रथम इस्राईलला मान्यता दिली होती.

यासंदर्भात माहिती देताना सहसचिव बी. बालाभास्कर म्हणाले, की गेल्या पंचवीस वर्षांतील भारत व इस्राईल दरम्यानच्या संबंधांची व्याप्ती मोठी आहे. विशेषतः कृषी क्षेत्र, विज्ञान व तंत्रज्ञान तसेच संशोधन, संरक्षण, जल व्यवस्थापन, ऊर्जा अशा विविध क्षेत्रांत भारत व इस्राईलदरम्यानचे सहकार्य विस्तारलेले आहे. भारतात पंधरा राज्यांत कृषिविषयक "सेंटर्स ऑफ एक्‍सलन्स' उभारून शेतीच्या उत्पादकता वाढीसाठी संशोधन, प्रयोग, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, जल व पीक व्यवस्थापन यासंदर्भात इस्राईलने भारताला भरीव मदत केली आहे. आता या केंद्रांबरोबरच त्यांना बाजारपेठेशी संलग्न करण्याबाबत या भेटीमध्ये विचार होणे अपेक्षित आहे.

मोदी हे या दौऱ्यात फक्त इस्राईललाच भेट देणार आहेत. सर्वसाधारणपणे भारतीय नेते इस्राईलबरोबरच पॅलेस्टाइनलाही भेट देत असतात. परंतु, मोदी या प्रथेला फाटा देणार आहेत. मोदी यांच्या स्वागताची भव्य तयारी करण्यात आली असून पोप किंवा अमेरिकेच्या अध्यक्षांच्या समकक्ष असे त्यांचे स्वागत केले जाणार असल्याचे सांगण्यात आले. इस्राईलमधील भारतीयांबरोबरही मोदी संवाद साधणार आहेत. त्यांची संख्या चार ते पाच हजार आहे.

"जी-20'लाही उपस्थिती
जर्मनीतील हॅंबर्ग येथे होणाऱ्या "जी-20' देशांच्या परिषदेला मोदी उपस्थित राहणार आहेत. व्यापार, आर्थिक सहकार्य, विकास, पर्यावरण व वातावरण बदल या मुद्द्यांबरोबरच दहशतवाद व त्याचा मुकाबला यावरही या परिषदेत उपस्थित राष्ट्रप्रमुखांमध्ये चर्चा होणे अपेक्षित आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com