prakash ambedkar
prakash ambedkar

संघाला शस्त्रांची गरज काय?: आंबेडकर

संघटनेची नोंदणी न केल्यास आंदोलन

नवी दिल्ली: स्वतःला सांस्कृतिक संघटना म्हणविणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची कोणत्याही कायद्याखाली नोंदणी झालेली नाही. येत्या दहा दिवसांत संघाने सरकारकडे नोंदणी केली नाही तर आंदोलन केले जाईल, असा इशारा दलित नेते आणि भारिप-बहुजन महासंघाचे प्रमुख ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी आज दिला.

विजयादशमीनिमित्त संघातर्फे होणाऱ्या शस्त्रपूजनावर तीव्र आक्षेप घेताना, संघाला प्राणघातक शस्त्रांची कशासाठी आवश्‍यकता आहे, असा प्रश्‍नही त्यांनी केला.
पत्रकारांशी बोलताना डॉ. आंबेडकर म्हणाले की, नोंदणीअभावी अलीकडेच सरकारने काही सामाजिक संस्था, संघटनांवर कारवाई केली असून, त्यांना परदेशी देणग्या स्वीकारण्यावर बंदी घातली आहे. मात्र, कंपनी कायदा, जनप्रतिनिधित्व कायदा, सहकार कायदा, विश्‍वस्त मंडळ कायदा, सोसायटी नियमन कायदा, कामगार संघटना कायदा, राज्यांमधील सार्वजनिक न्यास कायदा अशा कोणत्याही कायद्यानुसार संघाची नोंदणी झालेली नाही. असे असताना अशी संघटना देशात कशी सुरू राहू शकते. संघाला कोणतेही कायदे लागू होत नाहीत काय, असे प्रश्‍न डॉ. आंबेडकर यांनी उपस्थित केले.

संघाच्या शस्त्रपूजन प्रथेवरही डॉ. आंबेडकर यांनी टीका केली. कायद्याने केवळ रिव्हॉल्व्हर किंवा 303 बोअर रायफल वापरता येते. असे असताना संघाच्या शस्त्रपूजनात एके-47, टॉमी गन्ससारखी प्राणघातक शस्त्रे कशी येतात? केवळ सैन्यदले आणि पोलिसांकडेच ही शस्त्रे असतात. त्यामुळे संघाकडील बेकायदा शस्त्रे जप्त करावीत आणि शस्त्रपूजनाच्या नावाखाली घातक शस्त्रांच्या प्रदर्शनावरही बंदी घालावी, अशी मागणी डॉ. आंबेडकर यांनी केली. प्राणघातक शस्त्रांच्या पूजनामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीही सहभागी झाले होते, याकडे लक्ष वेधून डॉ. आंबेडकर म्हणाले की, आधीच दाभोलकर, कलबुर्गी, पानसरे यांसारख्या विचारवंतांना प्राण गमवावे लागले आहेत. असे असताना संघाला ही शस्त्रे कोणाविरुद्ध वापरायची आहेत, हे स्पष्ट व्हावे. संघाकडून घातक शस्त्रे जप्त केली जावीत, यासाठी जनतेनेच सरकारवर दबाव आणावा, असे आवाहन डॉ. आंबेडकर यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com