राजपथावर अवतरणार शिवराज्याभिषेक !

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 2 जानेवारी 2018

नवी दिल्ली: "युगनिर्माता महाराष्ट्राचा। आज शिवाजी राजा झाला।।....' हा गजर या वर्षीच्या 69 व्या प्रजासत्ताकदिनी राजपथावर दुमदुणार आहे.... यंदाच्या संचलनात महाराष्ट्रातर्फे शिवराज्याभिषेकावर आधारित देखावा- चित्ररथ सादर होणार आहे. या चित्ररथाच्या निर्मितीसाठी कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या नेतृत्वाखालील पथक दिल्लीत आले आहे. या वर्षी महाराष्ट्रासह 14 राज्यांचे चित्ररथ राजपथावर झळकणार आहेत.

यंदाच्या राज्याच्या चित्ररथावर रायगडावरील जगप्रसिद्ध मेघडंबरीची प्रतिकृती असणार असून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील कलाकारासह दहा कलाकार चित्ररथावर असतील. चित्ररथाच्या उजव्या आणि डाव्या बाजूला विविध प्रतिमांच्या माध्यमातून शिवराज्याभिषेक सोहळा दर्शविण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे गुणगौरव वर्णन करणाऱ्या गीतांची धूनही राजपथावर सादर होणार आहे.

राज्याच्या वतीने दिल्लीतील मराठी संस्कृतीचे वैशिष्ट्य दर्शविणारे दर्जेदार चित्ररथ प्रदर्शित करण्याची दीर्घ परंपरा आहे. यापूर्वी इंदिरा गांधींच्या काळात 1980 मध्ये महाराष्ट्राचा शिवराज्याभिषेक याच विषयावरील चित्ररथ होता. त्याला प्रथम पारितोषिक मिळाले होते. 1983 मध्ये बैल पोळा या चित्ररथास प्रथम क्रमांक मिळाला होता. यानंतर 1993 ते 1995 दरम्यान महाराष्ट्राच्या चित्ररथांनी प्रथम क्रमांकाची हॅट्ट्रिक केली होती. 2015 मध्ये प्रदर्शित पंढरीची वारी या चित्ररथास प्रथम क्रमांक मिळाला होता.

या वर्षी देशभरातून एकूण 29 राज्यांनी राजपथावरील चित्ररथांसाठी संरक्षण मंत्रालयाकडे अर्ज केले होते. विविध चाचण्यांनंतर महाराष्ट्रासह देशातील फक्त 14 राज्यांच्या चित्ररथांची निवड या संचलनासाठी झाली आहे. राज्याची गौरवशाली चित्ररथ परंपरा कायम ठेवण्याचे आव्हान देसाई व त्यांच्या पथकासमोर या वर्षी आहे.

Web Title: new delhi news Shivrajyabhishek will fall on the Rajpath!