'सीमा संरक्षणाच्या दृष्टीनेही मॅपिंग पॉलिसीत बदल; जग भारताकडे आशेने पाहतंय'

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 17 February 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बुधवारी आयटी उद्योगाशी निगडीत संस्था नॅसकॉमच्या NTLF च्या वार्षिक संमेलनाचे उद्घाटन केले.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बुधवारी आयटी उद्योगाशी निगडीत संस्था नॅसकॉमच्या NTLF च्या वार्षिक संमेलनाचे उद्घाटन केले. कोरोना महामारीमुळे पहिल्यांदाच या संमेलनाचे आयोजन ऑनलाइन पद्धतीने करण्यात आले आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं की, आता अशी वेळ आहे की, जगात भारताकडे नव्या आशेने आणि विश्वासाने पाहिले जात आहे. आपल्याकडे म्हटलं गेलंय की, संकट कसलेही असो, आपण स्वत:ला कमकुवत समजलं नसलं पाहिजे. कोरोनाच्या दरम्यान भारताने याबाबत स्वत:ला सिद्ध केलं आहे. पुढे त्यांनी म्हटलं की, आमचं सरकार हे चांगल्या पद्धतीने जाणतं की बंधनांमध्ये भविष्यातील लीडरशीप विकसित होऊ शकत नाही. त्यासाठी टेक इंडस्ट्रीला अनावश्यक नियमांमधून आणि बंधनांमधून मुक्त करण्याचे प्रयत्न केले जात आहेत.

त्यानंतर त्यांनी विविध क्षेत्रांचे उदारीकरण करण्याच्या दृष्टीने सरकारने घेतलेल्या पुढाकाराविषयी भाष्य केले. यातीलच एक म्हणजे मॅपिंग सेक्टरचा उल्लेख त्यांनी केला. गेल्या सोमवारीच सरकारने 5 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था आणि आत्मनिर्भर भारत किंवा स्वावलंबी भारताच्या दृष्टीने भौगोलिक माहिती आणि नकाशे यावरील नियमांमध्ये उदारीकरण केल्याचं म्हटलं. यामागे सीमेच्या संरक्षणासाठीचा विचार प्रामुख्याने होता. या बदलामुळे झालेले परिवर्तन आपल्याला सीमेवर दिसेल, असंही ते म्हणाले. 

हेही वाचा - स्वतंत्र भारतात पहिल्यांदाच होणार एका महिलेला फाशी; प्रेमासाठी 7 जणांची कुऱ्हाडीने हत्या

सरकारला देशातील नागरिकांवर, स्टार्ट्अपवर तसेच गुंतवणूकदारांवर पूर्ण विश्वास आहे. याच विश्वासासह त्यांना प्रोत्साहन दिलं जात आहे. गेल्या 6 वर्षांत आयटी इंड्स्ट्रीने ज्या सुधारणा केल्या आहेत, त्या आम्ही गव्हर्नंसचा भाग बनवल्या आहेत, असंही ते म्हणाले.

पुढे त्यांनी म्हटलं की, पारदर्शकता गुड गव्हर्नंसची पूर्वअट असते. हाच बदल आता देशाच्या शासनव्यवस्थेमध्ये देखील होत आहे. याच कारणामुळे प्रत्येक सर्व्हेमध्ये भारत सरकारवर जनतेचा विश्वास अधिकाधिक मजबूत होत आहे. आमच्या इन्फ्रास्ट्रक्चरशी निगडीत प्रोजेक्ट्स असोत किंवा गरिबांची घरे प्रत्येक प्रोजेक्टची Geo Tagging केली जात आहे. जेणेकरुन ते वेळेवर पूर्ण केले जाऊ शकतील. इतकंच नव्हे तर आज गावांमधील घरांचे मॅपिंग ड्रोनद्वारे केले जात आहे. टॅक्सशी निगडीत प्रकरणांमध्येही ह्युमन इंटरफेसला कमी केलं जात आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: new mapping policy biggest consideration was on security PM Modi At NASSCOM event