नवख्या खासदारांचे मोदीमंत्राकडे दुर्लक्ष 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 5 जुलै 2019

संसदेचे कामकाज चालू असताना अनुपस्थित राहू नका, सभागृहात वेळेवर या, संसदीय चर्चा लक्षपूर्वक ऐका, हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सल्ला किंवा आवाहन लोकसभेतील नवनिर्वाचित खासदार अजूनही ऐकत नसल्याचे चित्र दिसते. 

नवी दिल्ली ः संसदेचे कामकाज चालू असताना अनुपस्थित राहू नका, सभागृहात वेळेवर या, संसदीय चर्चा लक्षपूर्वक ऐका, हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सल्ला किंवा आवाहन लोकसभेतील नवनिर्वाचित खासदार अजूनही ऐकत नसल्याचे चित्र दिसते. 

लोकसभेत दुपारी एकनंतर सत्तारूढ बाकांवरील रोडावणारी संख्या, अधिवेशनकाळात संसदेला दांडी मारून समालोचनासाठी विदेशी जाणारे तसेच खासदार म्हणून स्वतःऐवजी स्वतःचा प्रतिनिधी नेमण्याइतपत पुढे गेलेले खासदार हे बहुतांश सत्तारूढ भाजपचेच आहेत, हे लक्षणीय मानले जाते. पंजाबच्या एका खासदारांनी तर कार्यशाळेसाठी स्वतःऐवजी चक्क सहायकालाच सही करण्यास पाठविल्याची माहिती आहे. 

सतराव्या लोकसभेवर तब्बल 267 खासदार पहिल्यांदाच निवडून आले आहेत. अर्थात, यातील अमित शहा, स्मृती इराणी, रविशंकर प्रसाद यांसारख्यांच्या दृष्टीने पहिल्यांदा खासदार ही तांत्रिक बाब ठरते. मात्र, या लोकसभेत संपूर्णपणे नवख्या असलेल्या खासदारांची संख्याही पावणेदोनशेच्या घरात आहे. या नव्या खासदारांसाठी संसदीय सचिवालयाने कालपासून चार दिवसांची कार्यशाळा किंवा प्रशिक्षण कार्यक्रम आखला आहे. कालपासून सुरू झालेली ही कार्यशाळा आज आणि सोमवार-मंगळवार या दिवशी होईल. संसदेचे नियम, कायदे, प्रश्‍न, शून्यप्रहरात व चर्चेत मांडले जाणारे मुद्दे, संसदीय ग्रंथालयातील विशाल ग्रंथसंपदा आदींबाबत खासदारांना माहिती दिली जाईल. यात गुलाम नबी आझाद, राजनाथसिंह, अमित शहा आदी ज्येष्ठ नेते नवीन खासदारांना संसदीय आचरणाचे धडे देतील. मात्र, या कार्यशाळेकडेही अनेकांनी पाठ फिरविल्याचे दिसत आहे. 

सहीसाठी सनीचे सहायक! 
"सकाळ'ला मिळालेल्या माहितीनुसार, पंजाबच्या गुरुदासपूरचे प्रतिनिधित्व करणारे अभिनेते सनी देओल यांनी काल (ता. 3) सायंकाळी या कार्यशाळेसाठी चक्क आपल्या स्वीय सहायकाला स्वाक्षरी करायला पाठवून दिले. सचिवालयाच्या अधिकाऱ्यांच्या हे लक्षात येताच त्यांनी संबंधित सहायकाला व्यवस्थित समजावून सांगितले व नंतर खासदार महोदयांशीही त्याबाबत चर्चा केली. भाजपचे दिल्लीतील दुसरे एक खासदार संसदेचे पहिलेच अधिवेशन चालू असताना येथे कमी व क्रिकेटचे समालोचन करण्यासाठी विदेशात जास्त, असे चित्र दिसत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: New MP ignores PM Narendra Modis Advise