
JNU मधली आंदोलनं आता थांबणार? विद्यापीठ प्रशासनाच्या नव्या नियमांमुळे चर्चा
जेएनयू विद्यापीठ म्हणजेच जवाहरलाल नेहरू विद्यापीठ हे तिथे सातत्याने होणाऱ्या विद्यार्थी आंदोलनांमुळे चर्चेत असते. मात्र आता अशा आंदोलनांना चाप बसवण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने नवा नियम काढला आहे. विद्यापीठ परिसरात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना २० हजारांपर्यंत दंड भरावा लागणार आहे.
जेएनयूच्या नव्या नियमांनुसार, विद्यापीठ परिसरात आंदोलन केल्यास विद्यार्थ्यांना २० हजार रुपये दंड भरावा लागू शकतो. तर या परिसरात हिंसा केल्यास विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द केला जाईल किंवा त्यांना ३० हजार दंड भरावा लागेल.
विद्यापीठाने एक दहा पानी नियमावली प्रसिद्ध केली आहे. यामध्ये वेगवेगळ्या कृतींसाठी वेगवेगळी शिक्षाही ठरवून देण्यात आली आहे. जर या नियमांचं उल्लंघन केल्यास संबंधितांची चौकशी करण्यात येईल, असंही या नियमावलीमध्ये नमूद केलं आहे.
विद्यापीठ प्रशासनाने काढलेले हे नवे नियम ३ फेब्रुवारीपासून लागू करण्यात आले आहे. विद्यापीठात गुजरात दंगलीवरची बीबीसीची वादग्रस्त डॉक्युमेंट्री दाखवण्यात आली होती. त्यानंतर झालेल्या आंदोलनानंतर हे नियम लागू करण्यात आले आहेत.
हे नवे नियम म्हणजे 'तुघलकी फर्मान' असल्याची प्रतिक्रिया विद्यार्थी संघटनांमधून उमटक आहे. जेएनयूमधल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सचिव विकास पटेल यांनी या नियमांचा निषेध केला आहे.