
- जोहरी यांचे प्रतिपादन; ड्रोनचा धोका वाढला
नवी दिल्ली : पाकिस्तान आणि बांगलादेशच्या सीमेवर सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब केला जात असल्याचे सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक व्ही. के. जोहरी यांनी सांगितले. गेल्या काही काळापासून पाकिस्तानकडून पश्चिम सीमेवर हालचाली टिपण्यासाठी ड्रोनचा वापर केला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अशा तंत्रज्ञानाचा मुकाबला करण्यासाठी भारताकडून महत्त्वाची पावले उचलली जात असल्याचेही जोहरी म्हणाले.
सीमा सुरक्षा दलाच्या एका शिबिरात 55 व्या स्थापनादिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात महासंचालक जोहरी बोलत होते. बीएसएफची स्थापना 1 डिसेंबर 1965 रोजी झाली होती. अंतर्गत सुरक्षेबरोबरच बीएसएफचे प्रमुख काम भारत-पाकिस्तान सीमेची सुरक्षा पाहणे आहे. जोहरी म्हणाले, भारत आणि पाकिस्तान सीमेवर ड्रोनचा धोका लक्षात घेता तंत्रज्ञान विकसित करण्याचे काम हाती घेतले आहे.
देवेंद्र फडणवीसच विरोधीपक्ष नेते
पाकिस्तान आणि बांगलादेशलगत 6 हजार 386 किलोमीटर लांबीच्या सीमेचे संरक्षण करण्यासाठी माहिती आणि तंत्रज्ञान आणि गुप्तचर यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेतले जात आहेत. गेल्या काही महिन्यांपासून काश्मीरमध्ये प्रत्यक्ष ताबा रेषा आणि पंजाबमध्ये आंतरराष्ट्रीय सीमाभाग अतिसंवेदनशील झाला असल्याचे जोहरी यांनी नमूद केले.
पंतप्रधानांच्या शुभेच्छा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीमा सुरक्षा दलाच्या 55 व्या स्थापना दिवसानिमित्त जवानांना शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत म्हटले की, सीमा सुरक्षा दलाचे जवान आपल्या सीमेची सुरक्षा अतिशय सक्षमतेने करत आहेत.
नैसर्गिक संकटात सापडलेल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठीही बीएसएफने नेहमीच पुढाकार घेतला आहे. देशातील घुसखोरी, तस्करी, हल्ल्याचा सामना करण्यासाठी "फर्स्ट लाइन ऑफ डिफेन्स' म्हणून भारतीय सीमेची सुरक्षा करण्याच्या उद्देशाने बीएसएफची स्थापना करण्यात आली आहे.