बंगळूरमध्ये पोलिसांसमोरच महिलांचा विनयभंग

वृत्तसंस्था
सोमवार, 2 जानेवारी 2017

बंगळूर - सरत्या वर्षाला निरोप देऊन नव्या वर्षाचे स्वागत करण्यात येत असताना बंगळूरमधील एमजी रस्त्यावर हजारो टवाळखोर पुरुषांनी अनेक महिलांचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

बंगळूर - सरत्या वर्षाला निरोप देऊन नव्या वर्षाचे स्वागत करण्यात येत असताना बंगळूरमधील एमजी रस्त्यावर हजारो टवाळखोर पुरुषांनी अनेक महिलांचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

शनिवारी रात्री उशिरा बंगळूरमधील एमजी रस्त्यासह ब्रिगेड रस्त्यावर नववर्षाचे स्वागत करण्यासाठी हजारो तरुण-तरुणी जमा झाले होते. दरम्यान मध्यरात्र उलटून गेल्यानंतर अनेक हुल्लडबाज, टवाळखोर पुरुषांचा जमाव रस्त्यावर असलेल्या महिलांशी असभ्य वर्तन करताना आढळून आला. हा जमाव महिलांना स्पर्श करत, त्यांच्याशी असभ्य वर्तणूक करत होता. विशेष म्हणजे याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त होता. याबाबत एका इंग्रजी वृत्तपत्राने वृत्त दिले आहे. या टवाळखोरांपासून सुटका करून घेण्यासाठी काही महिला पायातील चपला काढून हातात घेऊन दूर जात होत्या, असे वृत्तात म्हटले आहे. ब्रिगेड रस्त्यावर बंदोबस्तासाठी जवळपास दीड हजार पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. शिवाय याच परिसरात 60 पेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेरेही होते.

या पार्श्‍वभूमीवर प्रतिक्रिया व्यक्त करताना कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्‍वरा यांनी अशा घटनेमुळे बंगळूर असुरक्षित आहे, असे म्हणता येत नसल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, "ही घटना दुर्दैवी आहे. आम्ही तेथे 25 पेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेरे लावले होते. त्यांची तपासणी करण्यात येत आहे. बंगळूर सुरक्षित आहे. अशा एका घटनेमुळे शहर असुरक्षित आहे असे म्हणता येत नाही. दोषींना ताब्यात घेण्यासाठी आमचे अधिकारी प्रयत्न करत आहेत. अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून काळजी घेण्यात येत आहे. अशा घटना नववर्षाच्या वेळी आणि नाताळच्या वेळी घडत असतात.'

Web Title: On New Year's Eve, women molested in police presence