श्री श्री रविशंकर यांना कोर्टाने झापले

टीम ई सकाळ
गुरुवार, 20 एप्रिल 2017

एनजीटीने रविशंकर यांच्या टीकेची दखल घेताना 'तुम्हाला काहीही बोलण्याचा अधिकार दिला आहे, असे वाटते का?', अशी विचारणाही त्यांना केली. 'तुम्हाला जबाबदारीची काही जाणिव आहे की नाही,' अशी विचारणाही कोर्टाने रविशंकर यांना केली.

नवी दिल्ली : राष्ट्रीय हरीत लवादाने (नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल- एनजीटी) आज (गुरूवार) श्री श्री रविशंकर आणि आर्ट ऑफ लिव्हिंग फौंडेशनला यमुना नदीच्या प्रदूषणप्रकरणावरून झापले. 'तुम्हाला जबाबदारीची काही जाणिव आहे की नाही,' या शब्दात एनजीटीने रविशंकर यांची कानउघडणी केली.

मार्च 2016 मध्ये आर्ट ऑफ लिव्हिंगतर्फे यमुना नदीच्या काठावर जागतिक सांस्कृतिक महोत्सव झाला होता. या महोत्सवाच्या आयोजनामुळे नदीच्या प्रदूषणात वाढ झाली आणि नदी काठाची हानी झाली, असा आरोप झाला आहे. त्यासंदर्भात एनजीटीमध्ये दावा सुरू आहे. एनजीटीने या घटनेचा सविस्तर अहवाल तयार केला आहे. त्या अहवालावर आणि त्या अनुषंगाने एनजीटीवर रविशंकर यांनी टीका केली होती.

एनजीटीने रविशंकर यांच्या टीकेची दखल घेताना 'तुम्हाला काहीही बोलण्याचा अधिकार दिला आहे, असे वाटते का?', अशी विचारणाही त्यांना केली. 'तुम्हाला जबाबदारीची काही जाणिव आहे की नाही,' अशी विचारणाही कोर्टाने रविशंकर यांना केली.

'आर्ट ऑफ लिव्हिंगवर ठपका ठेवण्याच्या कृत्यातून एनजीटीची कधीही सुटका होणार नाही. नैसर्गिक न्यायाच्या तत्वाची एनजीटीने पायमल्ली केली आहे. आर्ट ऑफ लिव्हिंगने महोत्सवासाठीच्या सर्व परवानग्या घेतल्या होत्या. त्यात एनजीटीच्या परवानगीचाही समावेश होता. दोन महिने एनजीटीने परवानगीचा अर्ज आपल्याकडे ठेवला. त्यांनी परवानगी दिली आणि काहीही नुकसान न केल्याबद्दल नंतर दंडही ठोठावला,' अशी टीका रविशंकर यांनी केली होती.

एनजीटीने नुकसानीची पाहणी करण्यासाठी समिती नेमली होती. या समितीच्या अहवालानुसार, यमुनेच्या काठाचे सुमारे 13.29 कोटी रूपयांचे नुकसान झाले आहे. महोत्सवामुळे झालेली नैसर्गिक हानी भरून येण्यासाठी सुमारे दहा वर्षे लागतील, असेही समितीने अहवालात म्हटले आहे. महोत्सवासाठी नैसर्गिक पूरक्षेत्राचे सपाटीकरण केले. हा प्रदेश सखल बनवून त्यावरील सर्व गवत नष्ट करण्यात आले, असे 47 पानी अहवालात म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NGT slams Sri Sri Ravishankar over Yamuna pollution case