अब्दुल सुभान कुरेशी - भारताचा "मोस्ट वॉंटेड' दहशतवादी जेरबंद

वृत्तसंस्था
सोमवार, 22 जानेवारी 2018

अहमदाबादशिवाय दिल्ली, बंगळूर आणि 2006 मध्ये मुंबईतील लोकलमध्ये घडविण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यांसंदर्भातही कुरेशी हा राष्ट्रीय तपास संस्थेस (एनआयए) हवा होता. मुळचा मध्य प्रदेशमधील येथील रामपूरचा असलेला कुरेशी हा वेश बदलण्यात पटाईत होता. यामुळे त्याने अनेक वेळा तपास संस्थांना गुंगारा दिला होता. बॉंब बनविण्याचे तंत्रज्ञानही त्याने हस्तगत केले होते

नवी दिल्ली - गुजरात येथे 26 जुलै, 2008 रोजी घडविण्यात आलेल्या बॉंबस्फोटांच्या मालिकेचा मुख्य सूत्रधार अब्दुल सुभान कुरेशी उर्फ तौकिर या कुख्यात दहशतवाद्यास दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. भारताचा "बिन लादेन' अशी ओळख असलेल्या या दहशतवाद्यास 26 जानेवारीच्या पार्श्‍वभूमीवर झालेली अटक, हे सुरक्षा यंत्रणांचे धवलतम यश मानले जात आहे.

कुरेशी याच्याबरोबर झालेल्या छोट्या चकमकीनंतर दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने त्याला अटक केली. "कुरेशी हा गेल्या वर्षांपासून भूमिगत झाला होता. मात्र आता भारतात दहशतवादी हल्ले घडविणाऱ्या इंडियन मुजाहिदीनचे पुनरुज्जीवन करण्याच्या उद्देशार्थ तो भारतात परतला होता,' असे या पथकामधील मुख्य अधिकारी असलेले पोलिस उपायुक्त प्रमोद कुशवाह यांनी सांगितले.

अहमदाबाद येथे घडविण्यात आलेल्या तब्बल 21 बॉंबस्फोटांच्या मालिकेनंतर या कटामागील मुख्य सूत्रधार म्हणून गुजरात पोलिसदलाने कुरेशीचे नाव जाहीर केले होते. या दिवसापासूनच त्याचा कसून शोध घेण्यात येत होता. इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेने या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. माध्यमांना या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारणारा मेल पाठविणाऱ्याचे नाव "अल अरबी' असे होते.

अहमदाबादशिवाय दिल्ली, बंगळूर आणि 2006 मध्ये मुंबईतील लोकलमध्ये घडविण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यांसंदर्भातही कुरेशी हा राष्ट्रीय तपास संस्थेस (एनआयए) हवा होता. मुळचा मध्य प्रदेशमधील येथील रामपूरचा असलेला कुरेशी हा वेश बदलण्यात पटाईत होता. यामुळे त्याने अनेक वेळा तपास संस्थांना गुंगारा दिला होता. बॉंब बनविण्याचे तंत्रज्ञानही त्याने हस्तगत केले होते.

1998 मध्ये सिमी या इस्लामी मूलतत्त्ववादी संघटनेत सहभागी झालेल्या कुरेशी याने त्याआधी बंगळूर व हैदराबाद येथील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांमध्ये काम केले होते. सिमीकडून तो कालांतराने इंडियन मुजाहिदीनकडे वळाल्याचे सूत्रांनी सांगितले.

Web Title: NIA most wanted Abdul Subhan Qureshi arrested by Delhi Police