तमिळनाडूत एनआयएचे सात ठिकाणी छापे

वृत्तसंस्था
बुधवार, 12 जून 2019

राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) आज (बुधवार) तमिळनाडूतील कोईंबतूरमध्ये सात ठिकाणी छापे टाकले.

चेन्नई : राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) आज (बुधवार) तमिळनाडूतील कोईंबतूरमध्ये सात ठिकाणी छापे टाकले. 21 एप्रिलला श्रीलंकेत झालेल्या बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी जहरान हाशिम याचा मित्र कोईंबतूरमध्ये राहत असल्याची माहिती एनआयएला मिळाली होती. हा संशयित हाशिमचा फेसबुक मित्र असल्याचे सांगितले जात आहे. ईस्टर संडेच्या दिवशी श्रीलंकेत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 11 भारतीयांसह 258 लोक मारले गेले होते.

जहरानच्या फेसबुक मित्रासोबत इस्लामिक स्टेटशी (आयएस) संबंधित अजून काहीजण कोईंबतूरमध्ये राहत होते. या अगोदर एनआयएने तमिळनाडूत दहा ठिकाणी छापे मारले होते. त्यावेळी आयएसच्या संशयित अतिरेक्यांविरोधात एनआयएने खटला दाखल केला होता. गेल्या महिन्यात चेन्नईमध्ये ही शोधमोहिम राबविण्यात आली होती.

सात दहशतवादी लपल्याची माहिती श्रीलंकेने दिली
कोईंबतूरमध्ये आयएसशी संबंधित सात दहशतवादी लपल्याची माहिती श्रीलंकेने दिली. एनआयएने या माहितीच्या आधारावर संशयितांविरूद्ध खटला दाखल करून शोधमोहिमेस सुरुवात केली. तसेच श्रीलंकेत झालेल्या बॉम्बस्फोटाशी निगडित एनआयएने केरळमध्येही छापे टाकले होते. 28 एप्रिल रोजी केरळमधील कासारगोड आणि पलक्कड येथील चार घरांची तपासणी केली होती. हल्ल्याची तयारी करण्यासाठी दहशतवादी काही दिवस केरळमध्ये राहिले होते, असे एनआयएच्या तपासणीतून स्पष्ट झाले होते.

एनआयएने 28 एप्रिलला कासारगोडमधील तीन संशयितांना ताब्यात घेतले होते. संशयितांकडून इस्लामी धर्म प्रचारक जाकिर नाईक यांच्या भाषणांच्या सीडी आणि इतर अनेक उपकरणे जप्त करण्यात आली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NIA Raids 7 locations in Tamil Nadu