दहशतवादास अर्थसहाय्य: एनआयएचे विविध ठिकाणी छापे

वृत्तसंस्था
रविवार, 4 जून 2017

आतापर्यंत घातलेल्या छाप्यांमध्ये तब्बल 1.15 कोटींची रक्कम, मालमत्ता विषयक कागदपत्रे, लष्कर-ए-तैयबा आणि हिझबुल मुजाहिदिन या दहशतवादी संघटनांचे लेटरहेड्‌स, पेनड्राईव्ह, लॅपटॉप इत्यादी सामान जप्त करण्यात आले आहे...

श्रीनगर : काश्‍मीर भागात अशांतता पसरवण्यासाठी दहशतवादाला अर्थ सहाय्य पुरवणाऱ्यांविरुद्ध आज (रविवार) राष्ट्रीय तपास संस्थेकडून (एनआयए) जम्मु काश्‍मीर, दिल्ली व हरियानात नव्याने छापे घालण्यात आले. एनआयएतर्फे काश्‍मीरमध्ये चार ठिकाणी; तर जम्मुमध्ये एका ठिकाणी कारवाई करण्यात आली. 

एनआयएतर्फे तेहरिक-ए-हुर्रियतचा नेता सय्यद अली शाह गिलानी याचे जवळचे सहकारी अझाज अकबर आणि जावेद अहमद बाबा उर्फ गाझी बाबा यांच्या घरावर, तसेच तेहरिक-ए-हुर्रियतच्या कार्यालयावर छापे घालण्यात आले. या छाप्यांमध्ये पाकिस्तानी चलनातील काही हजार रुपये तसेच संयुक्त अरब अमिरात व सौदी अरेबिया या देशांची चलने जप्त करण्यात आली आहेत. यासंदर्भात काही लोकांची चौकशी करण्यात येत असल्याची माहिती एनआयएकडून देण्यात आली आहे.   

एका वाहिनीने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये तेहरिक-ए-हुर्रियतचा सदस्य नईम खान याने पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनेकडून पैसे घेतल्याचे मान्य केल्याचे उघड झाल्यानंतर एनआयएने आपली कारवाई पुन्हा सुरु केली. नईम खान याने मात्र असे कोणतेही विधान न केल्याचा दावा केला आहे.  

आतापर्यंत घातलेल्या छाप्यांमध्ये तब्बल 1.15 कोटींची रक्कम, मालमत्ता विषयक कागदपत्रे, लष्कर-ए-तैयबा आणि हिझबुल मुजाहिदिन या दहशतवादी संघटनांचे लेटरहेड्‌स, पेनड्राईव्ह, लॅपटॉप इत्यादी सामान जप्त करण्यात आले आहे. 

एनआयएकडून आतापर्यंत जम्मु काश्‍मीरमधील 14 ठिकाणी, दिल्लीमधील सात ठिकाणी तसेच हरियानामधील एका ठिकाणी छापे घालण्यात आले आहेत.  

Web Title: NIA raids against Terror Funding