'एनआयए'कडून यूपी, पंजाबमध्ये छापे

पीटीआय
शुक्रवार, 18 जानेवारी 2019

नवी दिल्ली : दहशतवादी संघटना इसिसचे मोड्यूल असलेल्या हरकत उल हर्ब ए इस्लाम या संघटनेच्या तपासादरम्यान आज राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए)ने उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये संघटनेशी संबंधित आठ ठिकाणी छापे घातले. ही संघटना दिल्ली आणि उत्तर भारतातील अन्य ठिकाणी नेते आणि सरकारी कार्यालयांवर आत्मघाती हल्ले, तसेच साखळी स्फोट घडवून आणण्याचा कट रचत असल्याचा आरोप एनआयएने केला आहे. 

26 डिसेंबरपासून ते आतापर्यंत या संघटनेशी संबंधित 12 जणांना अटक करण्यात आली आहे. एनआयएने 12 जानेवारीला हापूड येथून मोहंमद अबसार (वय 24) यास अटक केली होती. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे आज एनआयएने छापासत्र राबविले. एनआयएने सांगितले, की इसिसचे मोड्यूल हरकत उल हर्ब ए इस्लाम ही संघटना देशात प्रजासत्ताक दिनाच्या काळात घातपात घडवून आणणार असल्याची माहिती मिळाली होती. एनआयएने राबविलेल्या छापासत्रात रॉकेट लॉंचर, आत्मघाती बेल्टचे साहित्य, टायमरसाठी उपयोगात आणले जाणारे 12 अलार्म घड्याळ जप्त केले.

याशिवाय 25 किलो स्फोटक साहित्य पोटॅशियम नायट्रेट, अमोनियम नायट्रेट आणि सल्फरही जप्त करण्यात आले आहे. या संघटनेने रिमोटने चालणारे आयईडी तयार करण्यासाठी रिमोटने चालणाऱ्या गाड्या आणि वायरलेस डोअरबेलची खरेदी केली होती. याशिवाय एनआयएने यापूर्वी घातलेल्या छाप्यादरम्यान स्टीलचे कंटेनर, इलेक्‍ट्रिक तार, 91 मोबाईल फोन, 134 सिम कार्ड, तीन लॅपटॉप, चाकू, तलवार, इसिसशी संबंधित कागदपत्रेदेखील जप्त केली होती. एनआयएच्या पथकाने रामपूर, बुलंदशहर, मेरठ, हापूड, अमरोहा आणि लुधियाना येथे छापे घातले. 

लुधियानात मौलवीला अटक? 

लुधियानातून एनआयएच्या पथकाला अनेक प्रकारची महत्त्वाची माहिती हाती लागली आहे. याप्रकरणी एका संशयिताला अटक करण्यात आली आहे. मोहंमद पाशा नावाच्या एका मौलवीला एनआयएच्या पथकाने काल रात्री अटक केली.

पंजाब पोलिसांच्या मदतीने एनआयएच्या पथकाने एका मशिदीत छापा घातला. हा मौलवी इसिस मोड्यूलचा भाग असू शकतो, असे एनआयएचे म्हणणे आहे. तो काही महिन्यांपूर्वीच लुधियानाला आला होता. त्याने उत्तर प्रदेशातील एका मदरशातून शिक्षण पूर्ण केले. तेथे इसिसच्या संशयितांशी संपर्कात आला. एनआयएकडून या कारवाईचा इन्कार केला जात असला तरी लुधियाना पोलिसांनी अटकेला दुजोरा दिला आहे. घटनास्थळी शस्त्रसाठा सापडला नाही. 

Web Title: NIA raids in UP Punjab