झाकिरची 100 कोटींची मालमत्ता 'NIA'च्या रडारवर

वृत्तसंस्था
शुक्रवार, 20 जानेवारी 2017

झाकिरने धार्मिक तेढ वाढवणारी गरळ ओकतच कार्पोरेट उद्योग क्षेत्रामध्येही आपले हातपाय पसरविल्याचे एका 'NIA'च्या अधिकाऱ्याने सांगितले.

नवी दिल्ली : वादग्रस्त मुस्लिम धर्मोपदेशक झाकिर नाईकची संपत्ती आता राष्ट्रीय तपास संस्थेच्या (NIA) रडारवर आली आहे. सध्या झाकिरच्या 78 बॅंक खात्यांची तपासणी केली जात असून त्याने व त्याच्या सहकाऱ्याने मुंबई व अन्य ठिकाणांवर रिअल इस्टेटमध्ये केलेल्या शंभर कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचाही शोध घेतला जात आहे. या प्रकरणी झाकिरची 'NIA'कडून चौकशीही होऊ शकते.

झाकिर नाईक आणि त्याच्या सहकाऱ्यांविरोधात राष्ट्रीय तपास संस्थेने मागील वर्षी दहशतवादविरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला होता; तसेच त्याच्यावर धार्मिक तेढ निर्माण केल्याचा ठपकाही ठेवला होता. झाकिरने धार्मिक तेढ वाढवणारी गरळ ओकतच कार्पोरेट उद्योग क्षेत्रामध्येही आपले हातपाय पसरविल्याचे एका 'NIA'च्या अधिकाऱ्याने सांगितले. 'NIA'ने आतापर्यंत नाईकच्या 20 सहकाऱ्यांची चौकशी केली असून यामध्ये त्याची बहीण नैलाह नौशाद नुराणीचाही समावेश आहे. आम्ही त्यांच्याकडून प्राप्तिकर विवरणाची कागदपत्रे आणि अन्य आर्थिक विवरणपत्रे मागविली असल्याचे 'NIA'च्या अधिकाऱ्याने सांगितले.
 

बॅंकांकडून माहिती मागविली
राष्ट्रीय तपास संस्थेने नाईक आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या खात्यांबाबतची माहिती विविध बॅंकांकडून मागविली आहे. नाईक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शंभर कोटी रुपये मुंबई आणि अन्य ठिकाणांवरील रिअल इस्टेटमध्ये गुंतविल्याचा संशय तपास यंत्रणेला आला आहे. या प्रकरणातील काही व्यक्तींनी केलेले आर्थिक व्यवहार संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. धार्मिक चित्रफितींची निर्मिती करणारी 'हार्मनी मीडिया प्रायव्हेट लिमिटेड' ही निर्मिती संस्थादेखील 'NIA'च्या रडारवर आहे.
 

'IRF'ची कृत्ये
झाकिर नाईकची स्वयंसेवी संस्था 'इस्लामिक रिसर्च फाउंडेशन'वर केंद्र सरकारने बंदी घातली असून तिच्यावर बेकायदा कारवायांचा ठपका ठेवण्यात आला आहे. भारत सरकारने अटक करू नये म्हणून झाकिर सध्या परदेशातच आहे. झाकिरच्या 'एनजीओ'चा संबंध हा दहशतवादी प्रचार व प्रसार करणाऱ्या 'पीस टीव्ही' शी असल्याचेही आढळून आले आहे. मागील वर्षी 1 जुलै रोजी ढाक्‍यातील कॅफेवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांनी आपले प्रेरणास्थान झाकिर नाईक असल्याचे सांगितल्यानंतर तो चर्चेत आला होता.

'पीस टीव्ही'ला आर्थिक मदत
झाकिरच्या 'इस्लामिक रिसर्च फाउंडेशन'ने आक्षेपार्ह कार्यक्रमांच्या निर्मितीसाठी 'पीस टीव्ही'ला मदत केली होती. यातील बहुतांश कार्यक्रमांची निर्मिती ही भारतामध्येच झाली असून त्यामध्ये नाईकच्या चिथावणीखोर भाषणांचाही समावेश आहे. हवाला व्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने झाकिर आणि त्याच्या सहकाऱ्यांविरोधात गुन्हा नोंदविला आहे. आता राष्ट्रीय तपास संस्थेने कारवाई केल्यास तो आणखीनच अडचणीत येऊ शकतो.

Web Title: NIA's close eye on zakir naik's assets