
US Election : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदीही बसणार भारतीय वंशाची व्यक्ती? स्वत:च केली घोषणा
नवी दिल्ली - काही दिवसांपूर्वीच इंग्लंडच्या पंतप्रधानपदी भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांची निवड झाली. त्यातच आता अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत भारतीय वशांची व्यक्ती असणार आहे.
अमेरिकेतील भारतीय वंशाच्या रिपब्लिकन नेत्या निक्की हॅली यांनी मंगळवारी (१४ फेब्रुवारी) अमेरिकेत २०२४ मध्ये होणाऱ्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूक लढवण्याची घोषणा केली. त्यासाठी त्यांनी आपला दावा मांडला आहे. हेली या दक्षिण कॅरोलिनाच्या माजी गव्हर्नर आणि संयुक्त राष्ट्रसंघातील अमेरिकेच्या माजी राजदूत आहेत.
माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २०२४ ची राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढविण्याची घोषणा केल्यानंतर हेली रिपब्लिकन उमेदवारीसाठी ट्रम्प यांना पहिल्या मोठ्या प्रतिस्पर्धी ठरल्या आहेत. वास्तविक पाहता, २०२४ मध्ये व्हाईट हाऊससाठी आपण आपल्या माजी बॉस अर्थात ट्रम्प यांना आव्हान देणार नाही, असे त्यांनी दोन वर्षांपूर्वी सांगितले होते.
भारतीय वंशाच्या रिपब्लिकन नेत्या निक्की हेली यांनी अमेरिकेत २०२४ मध्ये होणाऱ्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्या माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आव्हान देणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून आपला दावा मांडला.
दोन वर्षांपूर्वी ट्रम्प यांच्यासाठी हे आव्हान नव्हते, पण आता त्यांनी आपला विचार बदलला आहे. निक्की हेली यांनी गेल्या महिन्यात जो बायडेन यांच्याविरोधात अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याचे संकेत दिले होते. हेली यांचे आई-वडील भारतातील अमृतसरचे आहेत.