
गोंधळामुळे एकोणीस तास पाण्यात
नवी दिल्ली - दही-दुधासारख्या जीवनावश्यक पदार्थांवरील जीएसटीची कुऱ्हाड, महागाई आदी मुद्यांवर राज्यसभेत सरकारने विरोधकांना अपेक्षित नियमांनुसार चर्चेला नकार दिल्याने झालेल्या गोंधळामुळे पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यातील १८ तास ४४ मिनिटांचे कामकाज पाण्यात गेले.
राज्यसभेच्या पहिल्या आठवड्यातील कामकाजाची टक्केवारी २६.९० टक्क्यांवर घसरली. महागाईवर चर्चा करण्यास आम्ही तयार आहोत, असे सरकार व विरोधक म्हणतात. पण त्याबाबत चर्चा करून एका निष्कर्षावर येऊन कामकाज सुरळीत करण्यास काय अडचण आहे? असा सवाल उपसभापती हरिवंश यांनी केला आहे. महागाईवर विरोधकांना गंभीर चर्चा करायचीच नाही. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची ईडीकडून चौकशी सुरू झाल्याने त्याचा राग काँग्रेस सदस्य संसदेचे कामकाज ठप्प करून काढत आहेत, असा ठपका भाजपने ठेवला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना कोरोना झाला आहे. त्या बऱ्या होताच महागाईवर चर्चा घेऊ असे सभागृह नेते पीयूष गोयल यांनी सांगितले. मात्र गोयल यांचा पूर्वानुभव पाहता त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवणे कठीण नव्हे अशक्य आहे, अशी विरोधी पक्षांची भूमिका आहे.
पावसाळी अधिवेशनातील पहिले तीन दिवस मिळून जेमतेम १ तास १६ मिनिटे जे कामकाज झाले. शून्य प्रहर, प्रश्नोत्तर तास, विधेयकावरील चर्चा हे प्रत्यक्ष कामकाज गोंधळामुळे झालेच नाही. बुधवारनंतर सरकारने रणनिती बदलली व कितीही गोंधळ सुरू असला तरी प्रश्नोत्तराचा तास घ्यायचाच हे सूत्र प्रत्यक्षात आणले. त्यामुळे प्रश्नोत्तराचा तास कागदोपत्री झाल्याचे दिसले. सचिवालयाने जी माहिती दिली त्यात या प्रकारच्या प्रश्नोत्तर तासाच्या १ तास ५० मिनिटांचाही कामकाजात (७५ पैकी २२ प्रश्न) समावेश केला आहे. अगदी अखेरच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी प्रा. मनोज झा यांच्या आरोग्याचा अधिकार-२०२१ या एका खासगी विधेयकावर अडीच तास जी चर्चा झाली. तेच प्रत्यक्ष कामकाज राज्यसभेत झाले आहे. बेकायदेशीर कारवायांना निर्बंध हे सरकारी व ९ खासगी विधेयके सादर झाली. या विधेयकावर ४२ मिनिटे चर्चा झाल्यावर गोंधळामुळे कामकाज थांबवावे लागले.
राज्यसभेत नवीन प्रघात
गोंधळ सुरू झाला की घोषणा देणाऱ्या सदस्यांची नावे लिहून ती दुसऱ्या दिवशीच्या कामकाज इतिवृतात छापण्याचा नवा प्रघात राज्यसभेत सुरू झाला आहे. खुद्द सभापती वेंकय्या नायडू यांनीच ही सूचना केली होती. हौद्यात उतरून गोंधळ घालणारांची नुसती नावेच नव्हे तर, ‘या सदस्यांनी सुरळीत कामकाज होऊ देण्यात अडथळे आणले, फलक फडकाविले, अशा आशयाची टीपदेखील जोडा,अशीही नायडू यांनी सचिवालयाला सूचना केली आहे.
जिथे खासदारांनाही दाद मिळत नाही...!
ए खादा सामान्य नागरिक नव्हे तर एक खासदार प्रत्यक्ष-साक्षात पंतप्रधानांना निवेदन देतात, तेही संसदेत. पण ४-४ महिने उलटूनही त्यावर काहीही कार्यवाही होत नाही. एका संसद सदस्यांना हा अनुभव आला असेल तर आपल्या देशात महागाई, बेकारी, भ्रष्टाचार यांचे दाहक चटके सहन करत जगणाऱ्या सर्वसामान्यांची कथा व्यथा कोण व कशी ऐकणार असा सवाल उपस्थित झाला आहे. राज्यसभेत कोरोना साथीवरील चर्चेत डॉ. फौजिया खान यांनीच हा स्वानुभव सांगितला.
दुर्धर आजारांनी ग्रस्त असलेल्या हजारो बालकांवरील महागड्या उपचारांसाठी केंद्राने वेगळ्या निधीची तरतूद करावी यासंदर्भात निवेदन देऊन त्याबाबत चर्चा करण्यासाठी फौजिया खान यांनी पंतप्रधानांची वेळ मागितली होती. यंदा २४ मार्च २०२२ रोजी कामकाज चालू असताना ते निवेदन घेऊन डॉ. खान थेट पंतप्रधानांच्या आसनापाशी गेल्या होत्या. मोदींनी तातडीने याची दखल घेऊ, असे सांगितले होते. बालकांना होणारे दुर्धर आजार व त्यावरील महागडे उपचार या मुद्यावर सर्वपक्षीय २५ खासदारांनी एक गट (सपोर्ट ग्रुप) बनविला आहे. यात डॉ. खान यांच्यासह डॉ. शंतनू सेन, कुमार केतकर, एमी याज्ञिक, नीरज डांगी, अब्दुल वहाब, मनोज झा आदींचा समावेश आहे. २४ मार्चला पंतप्रधानांना निवेदन देऊनही त्यावर कार्यवाही अजून झालेली नाही, असे डॉ. खान यांनी चर्चेत सांगितले.
मी मरणाच्या दारात होते : रजनी पाटील
दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयात (आरएमएल) किती दुर्दशा आहे याचा अनुभव रजनी पाटील यांनी सभागृहात सांगितला.आठ दिवसांपूर्वी मध्यरात्री रजनी पाटील यांची तब्येत बिघडली तेव्हा त्या ‘आरएमएल’मध्ये गेल्या. तिथली दुर्गंधीपाहून तिथे कसे उपचार कसे होत असतील असा विचार मनात आला. त्यापेक्षा गंभीर म्हणजे, ‘मला श्वास घ्यायला त्रास होत आहे. आपण मरत आहोत, कृपया निदान ॲडमिट तरी करून घ्या’, असे पाटील डॉक्टरांना विनवत होत्या. पण डॉक्टर हलले नाहीत, असे पाटील यांनी सांगितले. हे ऐकताना सभागृहातील काही नेते हसले. तेव्हा यात हसण्यासारखे काही नाही, मी अक्षरशः मरणार होते, तुम्ही हसताय काय? भाजप सदस्यांनी गंभीर बनावे, सत्ता कायमची राहात नसते, असे त्यांनी संतप्तपणे सुनावले.
आरोपात खोटेपणा : डॉ. अनिल बोंडे
भाजपचे डॉ. अनिल बोंडे यांनी विरोधकांनी केलेल्या आरोपात खोटे जास्त होते व खोटे बोलण्याचा रोग झाला तर त्यांच्यावर लवकर इलाज करणे आवश्यक असते, असे प्रत्युत्तर दिले. बोंडे यांचे राज्यसभेतील हे पहिलेच भाषण होते.
‘बाके वाजवा’
तुम्ही लसीकरण प्रमाणपत्रावर मोदी यांचा फोटो छापता. मग कोरोनात जीव गमावलेल्यांच्या प्रमाणपत्रावरही मोदींचा फोटो छापा ना? असे विचारताना रजनी पाटील यांनी, मोदींचे नुसते नाव घेतले तरी भाजप सदस्य जोरजोरात बाके वाजवतात. माझ्या या सूचनेवरही आता वाजवा ना बाके, असे पाटील आवेशात म्हणाल्या.
Web Title: Nineteen Hours Wasted Due To Confusion Rajya Sabha Proceedings Parliament Session
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..