नीरव मोदी अखेर जाळ्यात; २९ मार्चपर्यंत कोठडी

नीरव मोदी अखेर जाळ्यात; २९ मार्चपर्यंत कोठडी

लंडन : पंजाब नॅशनल बॅंकेला हजारो कोटींचा चुना लावून परदेशात पळून गेलेला हिरे व्यापारी नीरव मोदी याला अखेर बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. लंडनमधील सरकारी यंत्रणेने ही कारवाई केली. मोदीच्या अटकेमुळे त्याला भारतात आणण्याची प्रक्रिया सुरू करता येईल, असा विश्‍वास भारताच्या परराष्ट्र खात्यामार्फत व्यक्त करण्यात आला आहे. न्यायालयाने जामीन नाकारल्यामुळे नीरव मोदीला २९ मार्चपर्यंत कोठडीत राहावे लागणार आहे.

लंडनमधील वेस्टमिन्स्टर न्यायालयाने मंगळवारी (ता. १९) मोदीला हजर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार लंडनच्या सरकारी यंत्रणेने ही कारवाई केली आहे. त्यानुसार मोदीला आता न्यायालयासमोर हजर केले जाईल. मोदी लंडनमधील उच्चभ्रू लोकवस्तीत राहत असल्याची बातमी तेथील एका वृत्तपत्राने दिली होती. तेथून तो आपला हिऱ्यांचा व्यवसायही चालवत होता. पदपथावरून निवांतपणे फिरतानाही त्याचा व्हिडिओ समोर आला होता.

२९ मार्चपर्यंत कोठडीतच!
पंजाब नॅशनल बॅंक घोटाळ्याप्रकरणी मुख्य आरोपी नीरव मोदी याचा जामीन अर्ज लंडनच्या वेस्ट मिनिस्टर न्यायालयाने फेटाळला. त्याला २९ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. नीरव मोदीला अटक केल्यानंतर न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. तसेच प्रवासाचे आणि कर भरल्याचे कागदपत्रेही सादर केले होते. पान २ वर  
नीरव मोदी अखेर जाळ्यात जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आता पुढील सुनावणी २९ मार्चला होणार आहे.

चौकीदाराचा प्रभाव दिसला - भंडारी
हजारो कोटींची कर्जे बुडवून देशाबाहेर पळालेला हिरे व्यापारी नीरव मोदी याला लंडनमध्ये बुधवारी (ता. २०) झालेली अटक ही देशाचे चौकीदार किती सावध, कार्यक्षम आणि प्रभावी आहेत, हे दर्शविणारी आहे, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांनी बुधवारी व्यक्त केली.

भंडारी म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी अभिमानाने आपण देशाचे चौकीदार असल्याचे सांगतात. त्यांच्या हाती देश सुरक्षित आहे. त्यांच्या सरकारने आर्थिक गुन्हेगारी रोखण्यासाठी कठोर कारवाई सुरू केल्यामुळे अनेक आर्थिक गुन्हेगारांना देशाबाहेर पलायन करावे लागले. पण हे आर्थिक गुन्हेगार परदेशात आश्रयाला गेले, तरी मोदी सरकारने पाठपुरावा करून त्यांच्यावर कारवाईसाठी प्रभावी पावले उचलली. नीरव मोदीची अटक हे मोदी सरकारच्या कठोर आणि प्रभावी कारवाईचे यश आहे.
त्यांनी सांगितले, की नीरव मोदी याला अटक झाल्यामुळे आता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि आधीच्या काँग्रेस आघाडी सरकारमधील अर्थमंत्री चिदंबरम यांच्यासारख्या त्यांच्या सहकाऱ्यांना अनेक प्रश्‍नांना उत्तरे द्यावी लागतील. पात्रता नसताना वशिल्याने बॅंकांकडून हजारो कोटींची कर्जे देणे आणि नंतर ती बुडवणे हा मोठा कर्जघोटाळा काँग्रेस सरकारच्याच आशीर्वादाने झाला होता. नीरव मोदीच्या जाबजबाबात आता त्याला कोणी कशी वशिल्याने कर्जे दिली आणि त्यात त्याने कोणाला कसा लाभ करून दिला, हे स्पष्ट होईल. त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांनाच आता जाब द्यावा लागेल.

तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आज अनेक कष्टाळू चौकीदारांसमवेत संवाद साधण्याचे सौभाग्य लाभले. राजकीय स्वार्थापोटी चौकीदारांना बदनाम करण्याचा प्रयत्न होत असला, तरी १३० कोटी भारतीय चौकीदारांच्या पाठीशी उभे आहेत. आपणही चौकीदार व मीदेखील चौकीदार.
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com