पीएमसी बँकेच्या खातेदारांचा अर्थमंत्र्यांना घेराव; काय आहे प्रकरण?

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 10 October 2019

पंजाब अँड महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह बँक गोत्यात आल्यामुळे चिडलेल्या खातेदारांनी आज (ता.10) अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या पत्रकार परिषदेआधी त्यांना घेराव घातला आणि निदर्शनं केली. 

मुंबई : पंजाब अँड महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह बँक गोत्यात आल्यामुळे चिडलेल्या खातेदारांनी आज (ता.10) अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या पत्रकार परिषदेआधी त्यांना घेराव घातला आणि निदर्शनं केली.  PMC बँकेच्या खातेदारांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी आपण रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शशिकांत दास यांच्याशी गव्हर्नरशी चर्चा करू, असं निर्मला सीतारामन यांनी यावेळी खातेदारांना सांगितलं आहे.

तसेच, पीएमसी बँक घोटाळ्याशी केंद्र सरकारचा काहीही संबंध नाही. या बँकेच्या खातेदारांनी माझ्यासमोर आंदोलन केलं. लुटारुंनी बँक लुटली आता खातेदारांचं काय हा प्रश्न निश्चितपणे महत्त्वाचा आहे असे नंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी स्पष्ट केले आहे.
 

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या मुंबई दौऱ्यावर आहेत. त्या भाजप कार्यालयात दाखल झाल्या त्यावेळी त्यांच्यासमोर पीएमसी बँकेच्या खातेदारांनी आंदोलन केलं आणि आमचे पैसे आम्हाला परत द्या अशी मागणी केली. काहीही करून आमच्या बँक खात्यातली रक्कम आम्हाला परत द्या, अशी मागणी त्यांनी केली. रिझर्व बँक किंवा न्यायालय काय करणार याच्याशी आम्हाला देणंघेणं नाही, असं या खातेदारांचं म्हणणं होते.

पीएमसी बँक गैरव्यवहाराबद्दल आरबीआय गव्हर्नर म्हणतात...

 

सहकारी बँकांवर नियंत्रक नेमण्यावर विचार होणार असून संसदेच्या हिवाळी अधिवेशनात याबदद्लचं विधेयक आणलं जाईल आणि गरज असेल तर कायद्यात बदल केला जाईल, असेही सीतारामण यांनी स्पष्ट केले आहे.

काय आहे पीएमसी बँक प्रकरण?
पीएमसी बँकेचे पदाधिकारी आणि संचालक यांनी ऑगस्ट 2008 ते 2019 या कालावाधीत भांडुपमधील पीएमसी बँकेतील ठराविक खात्यांची परतफेड होत नसताना ही माहिती आरबीआयपासून लपवली. कमी रकमेचा अर्ज, बनावट कर्ज खात्यांचा खोटा अभिलेख तयार करुन आरबीआयला माहिती सादर केली.

पीएमसीच्या खातेदारांसाठी टोल-फ्री क्रमांक

या सगळ्यामुळे 4335कोटी रुपयांचा बँकेला तोटा झाला. या पैशामधून हा गैरव्यवहार झाला. हा सगळा गैरव्यवहार हाऊसिंग डेव्हलपमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लि. ग्रुप ऑफ कंपनीच्या पुढाकारातून झाला. त्यांनी बँकेच्या पदाधिकाऱ्यांना हाताशी धरुन हा कट रचला. कर्जाची परतफेड न करता त्या रकमेचा फायदा स्वतःच्या फायद्यासाठी केला.

पीएमसी ग्राहकांना तात्पुरता दिलासा

ऑगस्ट महिन्याच्या शेवटी हा घोटाळा उघड झाला. याप्रकरणी आत्तापर्यंत १० पेक्षा जास्त जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी बँकेचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस यांना अटक करण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nirmala Sitharaman Assures PMC Bank Clients Says Will Talk To RBI Chief