भडगावची निशा पाटील ठरली 'वीरबाला'

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 18 जानेवारी 2017

भडगावच्या आदर्श कन्या महाविद्यालयात बारावीत शिकणाऱ्या निशा पाटीलने पुरस्काराबद्दल आनंद व्यक्त करतानाच आपण एका बालिकेचे प्राण वाचविल्याचे समाधान वाटत असल्याचे सांगितले.

नवी दिल्ली - जळगाव जिल्ह्यातील भडगाव येथील निशा पाटील हिला 2016चा राष्ट्रीय "वीरबाला' पुरस्कार जाहीर झाला आहे. या वर्षी देशभरातील 25 मुलांना राष्ट्रीय "बालवीर' व "वीरबाला' सन्मानाने गौरविण्यात येईल. त्यात राज्यातून निशा ही एकमेव आहे. निशाने जिवावर उदार होऊन गावातील एका घराला लागलेल्या आगीतून एका बालिकेचे प्राण वाचविले होते. भारतीय बालकल्याण परिषदेच्या अध्यक्षा गीता सिद्धार्थ यांनी आज शौर्य पुरस्कारांची घोषणा केली. या वेळी पुरस्कारविजेते बहुतांश बालवीर-वीरबाला उपस्थित होते.

देशातील शूरवीर मुलांना व मुलींना प्रोत्साहन म्हणून 1957 पासून भारतीय बालकल्याण परिषदेच्या वतीने राष्ट्रीय शौर्य पुरस्कार दिले जातात. यंदाच्या विजेत्यांमध्ये 12 मुली व 13 मुलांचा समावेश आहे. येत्या 23 जानेवारीला पंतप्रधानांच्या हस्ते त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले जाईल, तसेच प्रजासत्ताक दिनाच्या संचलनातही ही मुले सहभागी होतील. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हेही या मुलांशी संवाद साधतील. यंदा चार मुलांना मरणोत्तर शौर्य पुरस्कार जाहीर झाला आहे. सर्वोच्च भरत सन्मान अरुणाचल प्रदेशाच्या कुमारी तार पेजू हिला मरणोत्तर जाहीर झाला आहे. आठ वर्षांच्या तेजूने नदीत बुडणाऱ्या आपल्या दोन मैत्रिणींचे प्राण धाडसाने वाचविले होते. मात्र तिला आपला जीव गमावावा लागला. यशिवाय गीता चोप्रा पुरस्कार 18 वर्षांच्या तेजस्विता प्रधान व 17 वर्षांच्या सिवानी गोंड यांना जाहीर झाला आहे. त्यांनी आंतरराष्ट्रीय महिला देहव्यापार रॅकेट उद्‌ध्वस्त करण्यासाठी पश्‍चिम बंगाल पोलिस व स्वयंसेवी संस्थांना मोलाची मदत केली होती. यातील सूत्रधाराला दिल्लीतून गतवर्षी अटक करण्यात आली होती. संजय चोप्रा पुरस्कार उत्तराखंडचा 15 वर्षांय सुमीत माम्गेन याला मरणोत्तर जाहीर झाला आहे.

प्राण वाचवल्याचे समाधान
भडगावच्या आदर्श कन्या महाविद्यालयात बारावीत शिकणाऱ्या निशा पाटीलने पुरस्काराबद्दल आनंद व्यक्त करतानाच आपण एका बालिकेचे प्राण वाचविल्याचे समाधान वाटत असल्याचे सांगितले. निशाने अतुलनीय धाडस दाखवून 14 जानेवारी 2015ला गावातील एका घराला लागलेल्या आगीतून पूर्वी देशमुख या बालिकेचे प्राण वाचविले होते. आठवीत असताना हिंदीच्या पुस्तकातील "साहसी बालक' या धड्यातून आपल्याला प्रेरणा मिळाली, असेही तिने सांगितले.

Web Title: Nisha Patil, Bhadgon (Jalgaon), saved 6-month baby from burning hut, get National Bravery Award