आमच्या नेत्यांच्या तोंडात बोळा कोंबण्याची गरज- नितीन गडकरी

आमच्या नेत्यांच्या तोंडात बोळा कोंबण्याची गरज- नितीन गडकरी

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाजपच्या वाचाळवीर नेत्यांना आज (ता. 20) चांगलंच फटकारले आहे. आमच्या काही नेत्यांनी तोंड बंद ठेवण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी माध्यमांना सामोरं जाताना कमी बोललं पाहिजे. यावेळी त्यांनी ‘बॉम्बे टू गोवा’ या चित्रपटाचे उदाहरण दिले. या चित्रपटात आपल्या मुलाची सतत खायची सवय मोडण्यासाठी पालक त्याच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबतात, असे दृश्य आहे. आमच्या पक्षातील काही नेत्यांचेही असेच झाले आहे, त्यांच्या बाबतीतही असेच काहीतरी करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

दिल्लीत एका इंग्रजी वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. राफेल प्रकरणावर भाजपकडून घेण्यात आलेल्या 70 पत्रकार परिषदेवर नितीन गडकरी यांनी भाष्य केलं. आमच्याजवळ भरपूर नेते आहेत आणि त्यातील काहींना पत्रकारांशी बोलण्यास फार आवडते. त्यामुळेच आम्हाला त्या उत्साही नेत्यांना दुसरं काम देण्याची आवश्यकता आहे, असंही गडकरी यांनी स्पष्ट केले. गप्प राहण्याचा आदेश हा हनुमानाची जात आणि राहुल गांधींचं गोत्र काढणाऱ्यांसाठी आहे का, असा प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी ते सर्व मस्करीत बोलल्याचं सांगत बाजू मारून नेली.

गडकरी म्हणाले, मी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्याही कार्यक्रमानंतर मीडियाशी बोलत नाही. राफेलच्या प्रकरणात काँग्रेसच्या संयुक्त संसदीय समिती(जेपीसी)च्या मागणीवरही त्यांनी भाष्य केलं. जेपीसी सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठी आहे काय, असा प्रश्न त्यांनी काँग्रेसला विचारला आहे. काँग्रेसच्या आरोपांमध्ये तथ्य नसल्यानं त्यांना उत्तर देणं गरजेचं नसल्याचंही नितीन गडकरी म्हणाले आहेत. 

लोकसभासाठी होणाऱ्या महाआघाडीवरही गडकरी यांनी वक्तव्य केले. ते म्हणाले की, ही कमजोरांची महाआघाडी आहे, नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान होणार आहेत. 1971 मध्ये तत्कालीन पंतप्रधान झालेल्या इंदिरा गांधी यांनी सामूहिक विपक्षांचा सामना करत एकहाती सत्ता मिळवली होती. त्याप्रमाणेच मोदी पुन्हा एकदा विजयी होतील. कमजोर आणि पराभूत झालेल्या लोकांची ही आघाडी आहे. जे एकमेंकाचा सन्मान करत नाहीत.

भाजपवर सतत टीका करणाऱ्या मित्रपक्ष शिवसनेवर विचारलेल्या प्रश्नावर गडकरी म्हणाले की, दोन्ही पक्षांमध्ये वाजपेयी असताना जसे संबंध होते तसेच आताही आहेत. ‘तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून करमेना’ या म्हणीप्रमाणे शिवसेना-भाजपचे झालं आहे. महाराष्ट्र, मराठी लोकांच्या आणि देशासाठी आमची युती लाभदायक आहे, असे गडकरी म्हणाले. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगढ या राज्यांतील विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाला आहे. त्यामुळे भाजपला आगामी लोकसभा निवडणुकीसाठी नव्याने रणनीती आखावी लागणार आहे असेही गडकरी म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com