नोटाबंदीबाबत नितीश कुमारांचा सावध पवित्रा

वृत्तसंस्था
मंगळवार, 3 जानेवारी 2017

25 डिसेंबरला सुरू झालेल्या प्रकाशपर्वाची सांगता 5 जानेवारीला होत असून, पाटणा येथे आयोजित कार्यक्रमास पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. तसेच, नोटाबंदीविरोधात कॉंग्रेस व राजदने घेतलेल्या भूमिकेला नितीश कुमार यांनी पाठिंबा द्यावा, अशी अपेक्षा उभय पक्षांना आहे.

पाटणा - केंद्र सरकारच्या नोटाबंदी निर्णयाला समर्थन देणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज याविषयी आणखी भाष्य करण्यास टाळाटाळ केली. नितीश कुमारांच्या या भूमिकेमुळे नाराज असलेल्या राष्ट्रीय जनता दलास (राजद) आणखी दुःखी न करण्याचा पवित्रा नितीश कुमार यांनी घेतल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे.

येथे आयोजित लोक संवाद कार्यक्रमादरम्यान पत्रकारांनी नितीश कुमार यांना नोटाबंदीविषयी बोलते करण्याचा प्रयत्न केला. त्यावर ""बिहारमधील चांगल्या गोष्टींना प्रसिद्धी द्या. प्रकाश वर्षनिमित्त राज्यात येणाऱ्या भाविकांना त्यातून माहिती मिळेल, त्यांचा ओढा वाढेल. ते चांगल्या आठवणी घेऊन येथून परततील,'' असे नितीश कुमार यांनी स्पष्ट करीत माध्यमांच्या प्रतिनिधींना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत नोटाबंदीवर बोलण्यास टाळाटाळ केली.

नोटाबंदी निर्णयाला 50 दिवस पूर्ण झाल्यानंतर नितीश कुमार यांची याबद्दलची भूमिका बदलतेय का, याची प्रतीक्षा राष्ट्रीय जनता दल करीत आहे. या पार्श्वभूमीवर राजद असलेले राजकीय संबंध आणखी ताणले जाऊ नयेत, असा प्रयत्न नितीश कुमार करीत असल्याची चर्चा आहे. नोटाबंदीचे समर्थन केल्याने नितीश कुमार व लालूप्रसाद यांच्यात काहीअंशी मतभेद निर्माण झाले आहेत.

इकडे आड तिकडे विहीर
25 डिसेंबरला सुरू झालेल्या प्रकाशपर्वाची सांगता 5 जानेवारीला होत असून, पाटणा येथे आयोजित कार्यक्रमास पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. तसेच, नोटाबंदीविरोधात कॉंग्रेस व राजदने घेतलेल्या भूमिकेला नितीश कुमार यांनी पाठिंबा द्यावा, अशी अपेक्षा उभय पक्षांना आहे. राज्यात आघाडी सरकार असल्याने नितीश कुमार यांची अवस्था इकडे आड तिकडे विहीर अशी झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nitish kumar avoids question on demonetization