नोटाबंदीचा निर्णय साहसी : नितीशकुमार 

पीटीआय
शनिवार, 26 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली : केंद्र सरकारने घेतलेला नोटाबंदीचा निर्णय साहसी असून, यामुळे काळ्या पैशाविरोधातील लढ्याला निश्‍चित मदत मिळेल, असे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आज स्पष्ट केले. 

नवी दिल्ली : केंद्र सरकारने घेतलेला नोटाबंदीचा निर्णय साहसी असून, यामुळे काळ्या पैशाविरोधातील लढ्याला निश्‍चित मदत मिळेल, असे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आज स्पष्ट केले. 

या निर्णयाची पाठराखण करतानाच नितीशकुमार म्हणाले, ""नोटाबंदीचा निर्णय म्हणजे एक साहसी पाऊल म्हणावे लागेल. या निर्णयावरून राज्यातील आघाडी सरकारमध्ये कोणतेही मतभेद नसून, बिहिशेबी मालमत्तेविषयी आणखी काही ठोस पावले उचलल्यास यातून झालेले सकारात्मक परिणाम आपणास उद्या पाहावयास मिळतील.'' या निर्णयाची अंमलबजावणी करताना काही उणिवा राहिल्याने याचा फटका सर्वसामान्यांना बसला असून, त्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत असल्याची कबुलीही नितीशकुमार यांनी या वेळी दिली. 

या निर्णयाकडे पाहताना आपण त्यातील कमरतेसोबत जमेची बाजूही पाहिली असून, काहीजण मात्र या निर्णयाकडे नकारात्मक दृष्टीने पाहत आहेत. माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी संसदेत केलेले भाषण पाहा, त्यांनी कुठेही हा निर्णय नाकारलेला नाही. मात्र, अंमलबजावणीतील त्रुटींकडे त्यांनी सर्वांचे लक्ष्य वेधले. असे नितीशकुमार यांनी या वेळी आवर्जून सांगितले. 
दरम्यान, 10 नोव्हेंबरला चेतना सभेत नितीशकुमार यांनी या निर्णयाचे जाहीररीत्या समर्थन केले होते. 

आघाडी शाबूत 
राष्ट्रीय जनता दल व कॉंग्रेस यांच्याशी फक्त राज्यात आघाडी आहे. राज्याशी निगडित बाबींवर आमच्यात एकमत असून, राज्याबाहेर या पक्षांच्या भूमिका किंवा एखाद्या निर्णयाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा असू शकतो. असे स्पष्ट करीत नितीशकुमार यांनी नोटाबंदी निर्णयावरील वेगवेगळ्या भूमिकेमुळे आघाडीत धुसफूस असल्याच्या चर्चेला पूर्णविराम दिला. 

या निर्णयाची पाठराखण करणे ही त्यांची राजकीय गरज असल्याची टीका प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली होती. त्यावर बोलताना नितीशकुमार म्हणाले, माझी अशी कोणती गरज आहे, की मी त्यासाठी नाहक कशाचेही समर्थन करील. जे मला योग्य व बरोबर वाटते, त्याची बाजू मी नेहमी घेतो. ममता बॅनर्जींनी या निर्णयाविरोधात आपल्याशी चर्चा केली होती. त्यांसोबत आपण या निर्णयाला विरोध दर्शवावा, असे त्यांचे म्हणणे होते. मात्र, आपण त्यांना स्पष्टपणे नकार दर्शविला. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनीही या निर्णयाचे समर्थन केल्याचे आपण ममता यांच्या निदर्शनास आणून दिले, असे नितीशकुमार यांनी शेवटी स्पष्ट केले. 

Web Title: Nitish Kumar backs PM Narendra Modi on demonetisation