भाजप, जेडीयूची जोडी सचिन, सेहवागसारखी - राजनाथसिंह

सकाळ न्यूज नेटवर्क
Thursday, 22 October 2020

बिहारमध्ये आघाडीने केलेल्या विकासकामांवर कुणीही आक्षेप घेऊ शकते पण मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर मात्र कोणीही गैरव्यवहाराचा आरोप करू शकत नाही असे राजनाथसिंह येथील सभेत बोलताना म्हणाले. 

भागलपूर (बिहार) -  बिहारमध्ये भाजप आणि संयुक्त जनता दल (जेडीयू) यांची जोडी ही सलामीला उतरलेल्या सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग यांच्यासारखी असल्याचे प्रतिपादन भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी आज केले. बिहारमध्ये आघाडीने केलेल्या विकासकामांवर कुणीही आक्षेप घेऊ शकते पण मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर मात्र कोणीही गैरव्यवहाराचा आरोप करू शकत नाही असे राजनाथसिंह येथील सभेत बोलताना म्हणाले. 

राजनाथ यांनी राष्ट्रीय जनता दलावर निशाणा साधताना सांगितले, की विरोधकांना तुम्ही पंधरा वर्षे दिली होती पण आता मात्र तुम्ही गैरव्यवस्थापन सुशासन यांच्यातील फरक पाहू शकता. मागील अनेक दशकांपासून बिहारमध्ये ज्यांची वाणवा होती त्या पायाभूत सुविधा नितीश यांनी उपलब्ध करून दिल्या आहेत. आज बिहारमध्ये रस्ते, विद्युत आणि पेयजल देखील मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध आहेत.नितीशकुमारांनी बिहारसाठी सगळेच काही केले आहे असा दावा मी करणार नाही पण त्यांच्या विश्‍वासर्हतेबाबत मात्र कुणीही शंका घेऊ शकणार नाही. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा एकही आरोप झालेला नाही असे सांगताना राजनाथ यांनी सीमेवर शौर्य गाजविणाऱ्या बिहार रजिमेंटचा देखील गौरवपूर्ण केला. 

मद्यबंदीचा फेरआढावा घेणार ः काँग्रेस 
महाआघाडीचा घटक असलेल्या काँग्रेस पक्षाकडून आज विधानसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. पुन्हा सत्तेमध्ये आल्यास आम्ही राज्यातील दारूबंदीचा फेरआढावा घेऊ असे आश्‍वासन या जाहीरनाम्यात देण्यात आले आहे. दारूबंदी केल्याने राज्यातील महसूल मोठ्याप्रमाणावर घटला असून राज्य सरकारने याचा सकारात्मक उद्देश लक्षात घेतलेला नसल्याचे या जाहीरनाम्यात नमूद करण्यात आले आहे. दारूवर बंदी घातल्याने राज्यात मद्याचा बेकायदा व्यापार फोफावला असून त्याचा मोठा लाभ पोलिसांना मिळतो आहे, सर्वसामान्य जनता मात्र त्यामुळे त्रस्त झाल्याचा दावा यात करण्यात आला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

लोकजनशक्तीचे व्हीजन डॉक्युमेंट प्रसिद्ध 
लोकजनशक्ती पक्षाचे प्रमुख चिराग पासवान यांनी आज बिहार फर्स्ट, बिहारी फर्स्टचा नारा देत पक्षाचे व्हीजन डॉक्युमेंट प्रसिद्ध केले. लाखो लोकांनी केलेल्या सूचनांच्या आधारे हे व्हीजन डॉक्युमेंट तयार करण्यात आले असून खुद्द रामविलास पासवान यांच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू असताना या व्हीजन डॉक्युमेंवर देखील काम सुरू होते असे त्यांनी सांगितले. नितीशकुमार यांच्यासारखे नेते राज्यामध्ये माझ्यासारख्या तरुण नेत्यांचे पाय ओढण्याचे काम करतात. याखेपेस नितीश विजयी झाले तर बिहार पराभूत होईल असा दावा त्यांनी केला. राज्यात नव्याने वैद्यकीय, अभियांत्रिकी महाविद्यालये सुरू करण्याबरोबरच राज्यातील आरोग्य सेवेचा दर्जा सुधारण्याचे आश्‍वासन या व्हीजन डॉक्युमेंटमध्ये देण्यात आले आहे. स्थलांतरित मजुरांसाठी वेगळे मंत्रालय स्थापन करण्याचे आश्‍वासन देखील लोकजनशक्ती पक्षाच्या व्हिजन डॉक्युमेंटमध्ये देण्यात आले आहे. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आयोगाकडून गर्दीची दखल 
बिहारमध्ये जाहीरसभांत सर्वच राजकीय पक्षांकडून कोरोनासंदर्भातील नियमांचे उल्लंघन होत असल्याने निवडणूक आयोगाने चिंता व्यक्त केली आहे. या सभांमध्ये मार्गदर्शन करताना नेते देखील मास्क घालत नसल्याचे पाहून आयोगाने नाराजी व्यक्त केली आहे. निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या नियमांचे कोठे उल्लंघन होत असेल तर तेथील अधिकाऱ्यांनी संबंधित पक्षाचे उमेदवार आणि सभांच्या आयोजकांवर कारवाई करणे अपेक्षित असल्याचे आयोगाकडून सांगण्यात आले. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्ल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nitish Kumar-BJP Alliance Like Sachin-Sehwag Pair