विरोधकांची एकी अजेंड्यावर आधारित हवी : नितीशकुमार

उज्ज्वलकुमार
मंगळवार, 4 जुलै 2017

राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीवरून सध्या राजकारण सुरू आहे. मात्र, त्यामुळे देशातील महत्त्वाच्या विषयांचा विसर पडत आहे. देशात गोरक्षेच्या नावाखाली हत्या होत आहेत, शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले

पटना - 2019च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) टक्कर देण्यासाठी विरोधकांची एकी अजेंड्यावर आधारित असली पहिजे आणि यामध्ये कॉंग्रेस हा मोठा पक्ष असल्याने अजेंडा ठरवण्याची जबाबदारी त्यांची आहे, असे मत बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी मांडले आहे.

2019च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाही, असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले. नितीशकुमार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत 2019ची लोकसभा निवडणूक, विरोधकांची एकजूट आदी विषयांवर भाष्य केले.

2019च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधानपदाच्या उमेदवारीसाठी इच्छुक आहात का, असा प्रश्न विचारण्यात आल्यानंतर नितीशकुमार म्हणाले, की मी पंतप्रधानपदाच्या स्पर्धेत नाही. या पदावर विराजमान होण्याची माझी पात्रतादेखील नाही. आमचा पक्ष छोटा असून, आम्ही अतिमहत्त्वाकांक्षा ठेवणे अयोग्य आहे.

विरोधकांकडे सध्या अजेंडाच नाही; पण त्यांनी सर्वप्रथम एक अजेंडा ठरवायला हवा, असे मत नितीशकुमार यांनी मांडले. विरोधकांमध्ये कॉंग्रेस हा सर्वांत मोठा पक्ष असल्याने त्यांनी मतदारांना एक सक्षम पर्याय दिला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत नितीशकुमार यांच्या संयुक्त जनता दल (जेडीयू) पक्षाने एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना पाठिंबा दिला आहे, तेव्हापासून नितीशकुमार हे भाजपशी हातमिळवणी करतील अशी चर्चा आहे. यावरदेखील त्यांनी भाष्य केले. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीवरून सध्या राजकारण सुरू आहे. मात्र, त्यामुळे देशातील महत्त्वाच्या विषयांचा विसर पडत आहे. देशात गोरक्षेच्या नावाखाली हत्या होत आहेत, शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

वस्तू आणि सेवाकराच्या स्वागतासाठी संसदेत विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात नितीशकुमार यांची गैरहजेरी चर्चेचा विषय ठरली होती; पण मला या सोहळ्याचे आमंत्रणच नव्हते, असे नितीशकुमार यांनी स्पष्ट केले.

Web Title: Nitish Kumar Election Opposition Congress