बिहारमध्ये राजकीय भूकंप;नितीशकुमारांचा राजीनामा

वृत्तसंस्था
बुधवार, 26 जुलै 2017

आम्ही युतीधर्माचे पालन केले. मात्र या परिस्थितीत काम करणे आता शक्‍य नाही. मी चांगले काम करण्याचा प्रयत्न केला. परंतु राजीनाम्याचा हा निर्णय माझ्या अंतरात्म्याचा आवाज आहे

पाटणा - बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आज (बुधवार) अचानक राजीनामा देण्याची घोषणा केली. नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील बिहारमधील सरकारमध्ये सहभागी असलेल्या राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) नेते लालुप्रसाद यादव यांचे पुत्र व राज्याचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) चौकशी सुरु केली आहे. या पार्श्‍वभूमीवर तेजस्वी यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भारतीय जनता पक्षाकडून (भाजप) करण्यात आली होती.

या प्रकरणामुळे सत्ताधारी संयुक्त जनता दल व राजदमध्ये गेल्या 20 दिवसांपासून मोठा राजकीय तणाव निर्माण झाल्याचेही आढळून आले होते. या पार्श्‍वभूमीवर, तेजस्वी यांच्या राजीनाम्यासंदर्भात नितीशकुमारांवरील दबाव वाढत चालल्याचे मानण्यात येत होते. दुसरीकडे लालुप्रसाद यांनी तेजस्वी यांच्या राजीनाम्याची शक्‍यता स्पष्टपणे फेटाळून लावताना थेट नितीशकुमार सरकार पाडण्याचा गर्भित इशारा दिला होता. या पार्श्‍वभूमीवर स्वत: नितीशकुमार यांनीच राजीनाम्याची घोषणा करत बिहारमध्ये मोठ्या राजकीय वादळाची शक्‍यता निर्माण केली आहे.

"आम्ही युतीधर्माचे पालन केले. मात्र या परिस्थितीत काम करणे आता शक्‍य नाही. मी चांगले काम करण्याचा प्रयत्न केला. परंतु राजीनाम्याचा हा निर्णय माझ्या अंतरात्म्याचा आवाज आहे,'' अशी प्रतिक्रिया नितीशकुमार यांनी या पार्श्‍वभूमीवर बोलताना व्यक्त केली. राजीनामा देण्याआधी नितीशकुमार यांनी त्यांच्या निवासस्थानी जदयुच्या आमदारांची बैठक घेतली व यानंतर राज्यपालांची भेट घेत त्यांच्याकडे राजीनामा सोपविल्याचे सूत्रांनी सांगितले. तेजस्वी यांचा राजीनामा मागितल्याचे वृत्त नितीशकुमार यांनी फेटाळून लावले.

तेजस्वी यांच्यावर हॉटेलच्या बदल्यात जमीन बळकावल्याच्या प्रकरणात सीबीआयने त्यांच्यावर दावा दाखल केला आहे. या प्रकरणी तेजस्वी यांनी राजीनामा देणे दूरच राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी मुख्यमंत्री नितीशकुमार यांनाच लक्ष्य केले. नितीशकुमार यांना आम्हीच मुख्यमंत्री बनविले असून, आम्हीच त्यांनी सत्तेवरून खाली खेचू, असा इशारा लालूंनी दिला.

"जर नितीशकुमार यांना आघाडीचे ओझे वाटत असेल तर त्यांनी त्यांचा मार्ग शोधावा,'' असा सल्लाही त्यांनी दिला. होता. या पार्श्वभूमीवर थेट राजीनाम्याची नितीशकुमार यांची घोषणा अत्यंत संवेदनशील मानण्यात येत आहे. या मोठ्या राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर बिहारमध्ये आता भाजपची भूमिकाही अत्यंत महत्त्वपूर्ण  मानण्यात येत आहे.  

बिहारमधील राजकीय स्थिती 
संयुक्त जनता दल : 71 
राष्ट्रीय जनता दल : 80 
कॉंग्रेस : 27 
भाजप : 53 
लोकजनशक्ती पक्ष : 2 
---------- 
बहुमत : 122

Web Title: Nitish Kumar Resigns in Bihar