बिहारमध्ये चमकी तापामुळे मृत्यूची संख्या 125 वर; नातेवाइकांचा संताप

वृत्तसंस्था
मंगळवार, 18 जून 2019

चमकी तापाने मुझफ्फरपूर येथे शंभराहून अधिक मुलांचा मृत्यू झाल्याने राज्यात खळबळ उडालेली असताना बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आज रुग्णालयात पोचले तेव्हा त्यांना रुग्णांच्या नातेवाइकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. रुग्णालयाबाहेर नागरिकांनी नितीशकुमार यांच्याविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली.
 

पाटणा/मुझफ्फरपूर : चमकी तापाने मुझफ्फरपूर येथे शंभराहून अधिक मुलांचा मृत्यू झाल्याने राज्यात खळबळ उडालेली असताना बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आज रुग्णालयात पोचले तेव्हा त्यांना रुग्णांच्या नातेवाइकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. रुग्णालयाबाहेर नागरिकांनी नितीशकुमार यांच्याविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली.

एसकेएमसीएच अणि खासगी केजरीवाल रुग्णालयात आतापर्यंत चमकी तापाने 127 बाळांचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. गेल्या चोवीस तासात चौघांचा मृत्यू झाला आहे. 

मुख्यमंत्री नितीशकुमार हे शनिवारपासून दिल्लीत होते आणि सोमवारी सायंकाळी पाटण्यात परतले. त्यानंतर त्यांनी चमकी तापाच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी अधिकाऱ्यांसमवेत आपत्कालीन बैठक बोलावली. या बैठकीनंतर सरकारी यंत्रणा कामाला लागली. रुग्णांवरील उपचाराचा संपूर्ण खर्च बिहार सरकार उचलणार असल्याचे जाहीर करण्यात आले.

खासगी असो, सरकारी रुग्णालय असो; बिहार सरकार संपूर्ण खर्च उचलेल, असे सांगण्यात आले. तेथे 300 हून अधिक मुलांवर उपचार सुरू आहेत. एक जूनपासून त्यांना ताप असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. आतापर्यंत रुग्णालयात 90 हून अधिक मुलांचा मृत्यू झाला आहे. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज सकाळी नितीशकुमार एसकेएमसीएच रुग्णालयात पोचले. यादरम्यान रुग्णालयाबाहेर नागरिक आणि रुग्णांच्या नातेवाइकांनी गर्दी केली आणि "नितीशकुमार गो बॅक' अशा घोषणा देऊ लागले.

पोलिस बंदोबस्त असल्यामुळे नातेवाईक आणि मुख्यमंत्री यांच्यात भेट होऊ शकली नाही. मुझफ्फरपूर येथे तीन दिवसांपासून मृत्यूचे थैमान सुरू असताना मुख्यमंत्र्यांनी उशिरा भेट दिल्याबद्दल नागरिकांनी संताप व्यक्त केला. आरोग्यसेवेच्या ढिसाळ कारभाराबद्दलही तीव्र नाराजी व्यक्त केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nitish Kumar visits Muzaffarpur to take stock of AES outbreak; angry locals shout slogans