एटीएम उशाशी; कोरड खिशाशी...!

संतोष धायबर
शुक्रवार, 16 डिसेंबर 2016

मोदी जी, तुमचा निर्णय योग्यच आहे. सर्वसामान्य नागिरकांना त्रास होत असला तरी ते तुमचे मनापासून आभार मानत आहेत. पण, तुम्हाला एकच विनंती आहे की काळ्या पैशांचा अथवा नव्या नोटांचा घोटाळा करणाऱयांवर कारवाई कराच. मग तो नेता असो वा अधिकारी. नेता तुमच्या पक्षाचा असो व नसो. देशातील चित्र बदला. सर्वसामान्य नागरिक तुमच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहेत आणि राहतीलही. पण... घोटाळे बहाद्दरांवर कारवाई कराच.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळ्या पैशांवर घाला घालण्यासाठी 8 नोव्हेंबर रोजी पाचशे व हजार रुपयांच्या नोटांवर बंदी घातली खरी पण बँकेतील खात्यावर पैसे असतानाही सर्वसामान्य नागरिकांना ते मिळत नाहीत. 'एटीएम उशाशी आणि कोरड खिशाशी' असे चित्र आज पहायला मिळत आहे.

मोदींनी पाचशे व हजार रुपयांच्या नोटांवर घातलेल्या बंदीचे स्वागतच करायला हवे. ते केलेही जात आहे. समाजामध्ये दोन स्तर निर्माण झाल्याचे दिसत होते. गरीब कर्जाच्या ओझ्याने खाली-खाली दबला जात होता. प्रसंगी आत्महत्येचा मार्ग स्विकारत होता. श्रीमंत अधिकाधिक श्रीमंत होत होता. यामुळे पाचशे व हजार रुपयांच्या सर्वाधिक नोटा कोणाकडे असणार, हे उघड आहे.

मोदींनी घेतलेल्या निर्णयाचे सर्वसामान्य नागरिकांना त्रास होत असला तरीही या निर्णयाचे सर्वसामान्य नागरिक आजही स्वागत करत आहेत. परंतु, महिनाभरानंतरही परिस्थिती सुधारायचे नाव घेत नाही. देशभरात विविध ठिकाणी टाकण्यात आलेल्या छाप्यांदरम्यान कोट्यावधी रुपये आढळत आहेत. पाचशे व हजार रुपयांच्या नोटा बाजारात येऊन काही दिवस होत नाहीत तर त्यांच्याकडे एवढे पैसे येतात कुठून? असा प्रश्न उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही. दुसरीकडे पाचशे व हजार रुपयांच्या एका नोटेसाठी सर्वसामान्य नागरिक तासन् तास रांगेत उभे राहताना दिसतात. प्रसंगी अनेकांना जीव गमवावा लागत आहे.

देशभरातील विविध बॅंकांमध्ये आयकर व सक्तवसुली संचलनालयाकडून धडक कारवाई सुरू आहे. कारवाईदरम्यान विविध बॅंकांच्या व्यवस्थापकांना ताब्यात घेण्यात येत आहे. बॅंकेमधील संपुर्ण माहिती ठेवण्याबरोबरच नवीन नोटांचा सीरिअल क्रमांक तसेच आरबीआयकडून मिळालेल्या चलनाची नोंद ठेवण्याचे सांगण्यात आले आहे. शिवाय, 8 नोव्हेंबर पासून ते 31 डिसेंबरपर्यंत बॅंकेतील सीसीटीव्हीचे चित्रीकरणही जपून ठेवण्याचे आदेश रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (आरबीआय) बॅंकांना दिले आहेत. या निर्णयाचेही स्वागत करायलाच हवे.

आयकर विभाग, सक्तवसुली संचलनालय व आरबीआय एवढे निर्बंध घालत असतानाही छाप्यांदरम्यान मोठ-मोठ्या रकमांबरोबरच अधिकारी अडकताना दिसतात. बंगळूरमधून तर आरबीआयच्या वरिष्ठ अधिकाऱयालाच नोटा बदलीप्रकरणी अटक करण्यात आली आहे, आता बोला. कुंपणच शेत खात असेल तर, दाद मागायची कोणाकडे? विविध बॅंका व सरकारी अधिकारी असे करत असतील तर काय बोलायचे? बिहारमध्ये एटीएममधून बनावट नोट मिळत आहे, बॅंकेचे अधिकारी हात झटकून मोकळे होतात. उंदराला मांजराची साक्ष, असाच प्रकार आहे. एका पक्षाच्या नेत्याने बँकेतून मोठी रक्कम नेल्याची चर्चा रांगेत उभे राहिलेल्या नागरिकांमध्ये आहे. बॅंकेच्या रांगेत उभे न राहता या नेत्याला ढिगभर पैसे मिळतातच कसे, हे कोडे अद्याप नागरिकांना सुटलेले नाही. कारवाई दरम्यान अनेक नेत्यांकडे मोठ्या रकमा आढळल्याच्या बातम्या येतात; पण पुढे काय होते, हे शेवटपर्यंत कोणालाच समजत नाही.

सर्वसामान्य नागरिकांना किती त्रास होत असेल, याची कल्पना एसीमध्ये बसून नक्कीच येणार नाही. अनेकांचे व्यवहार ठप्प झाले आहेत. पैसे असूनही ते मिळत नाहीत. विक्रीसाठी वस्तू आहे पण ती वस्तू विकली जात नाही, असे चित्र आजही आहे. अलिगडमध्ये बॅंकेच्या रांगेत चार दिवस उभे राहूनही पैसे मिळू न शकल्याने पतीला प्राण गमवावा लागल्याची तक्रार एका महिलेने केली. महिलेच्या तक्रारीची दखल मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना घ्यावी लागली आहे, हे झाले एक उदाहरण. देशभरात विविध ठिकाणी अशा घटना आजही घडत आहेत.

देशभरातील विविध शहरांमध्ये विविध बॅंकाचे एटीएम दिसतात पण पैसे नाहीत. खरंतर एटीएम उशाशी आणि कोरड खिशाशी अशी परिस्थिती आहे. मोदी जी, तुमचा निर्णय योग्यच आहे. सर्वसामान्य नागिरकांना त्रास होत असला तरी ते तुमचे मनापासून आभार मानत आहेत. पण, तुम्हाला एकच विनंती आहे की काळ्या पैशांचा अथवा नव्या नोटांचा घोटाळा करणाऱयांवर कारवाई कराच. मग तो नेता असो वा अधिकारी. नेता तुमच्या पक्षाचा असो व नसो. देशातील चित्र बदला. सर्वसामान्य नागरिक तुमच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहेत आणि राहतीलही. पण...घोटाळे बहाद्दरांवर कारवाई कराच.

Web Title: No cash in ATM