'युती सरकारमधील मित्रपक्षांत मतभेद नाहीत'

'युती सरकारमधील मित्रपक्षांत मतभेद नाहीत'

मडगाव- गोवा फाॅरवर्ड व मगोकडून अलिकडे भाजपच्या विरोधात भूमिका घेण्यात येत असल्याचे उघडपणे जाणवत असले तरी गोव्याच्या युती सरकारमधील  या मित्रपक्षांमध्ये मतभेद नसल्याचा दावा  भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी केला आहे. तिन्ही मित्र पक्षांचे अध्यक्ष एकत्रितपणे चर्चा करून सर्व विषय सोडवतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. 

गोवा फाॅरवर्डचे अध्यक्ष व नगरनियोजनमंत्री विजय सरदेसाई यांनी अलिकडेच खाण बंदी व जनमत कौल चळवळीचे नायक जॅक सिक्वेरा यांचा पुतळा उभारण्याच्या विषयावरून भाजपला इशारा दिला आहे. भाजपने प्रादेशिक आकांक्षांचे भान न जपल्यास लोकसभा निवडणूक जिंकणे कठीण होईल असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे, तर अन्य मित्र पक्ष मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी भापच्या विरोधात शिरोडा पोटनिवडणूक लढवणार असल्याचे जाहीर करून आपले प्रचारकार्यही सुरु केले आहे. दोन्ही मित्रपक्षांच्या या भूमिकेविषयी छेडले असता त्यांनी वरील प्रतिक्रिया दिली. 

सरदेसाई यांनी जनतेचा प्रश्न सुटावा या उद्देशाने वक्तव्य केले आहे. त्यामागे जनतेच्या प्रश्नाची तड लागावी ही कळकळ आहे. आम्ही त्यांच्याशी सल्लामसलत करतो, आपल्या सूचनाही ते करतात. ते गैर काही बोललेले नाहीत. जनतेचा प्रश्नच ते मांडत आहेत, असे तेंडुलकर यांनी स्पष्ट केले. 

ढवळीकर यांचा निवडणूक लढवण्याचा विषयही आम्ही त्यांच्याशी चर्चा करून सोडवणार आहोत. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या आजारपणामुळे युती सरकारमध्ये सहभागी असलेल्या भाजप, मगो व गोवा फाॅरवर्ड या तिन्ही पक्षांच्या समन्वय समितीची बैठक सध्या होत नाही. पण, तिन्ही पक्षांच्या अध्यक्षांमध्ये संवाद सुरुच असतो. आम्ही तिघेही अध्यक्ष एकत्रितपणे भेटून चर्चा करत असतो, असे तेंडुलकर यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com