'रागा'ची 'नमो' मिठी

वृत्तसंस्था
शनिवार, 21 जुलै 2018

नवी दिल्ली : राजकीय कुरघोड्या, शाब्दिक युद्धे आणि सत्तेसाठी रस्सीखेच लोकसभेसाठी नवी नाही. सत्तास्वार्थासाठी याच लोकशाहीच्या मंदिराचा अनेकदा आखाडा बनल्याचे, या देशातील "सव्वा सौ करोड' जनतेने अनेकदा "याचि देही, याचि डोळा' अनुभवले आहे. पण 20 जुलै हा दिवस भारतीय संसदीय इतिहासात अभूतपूर्व "फ्रेंडशिप डे' ठरला. निमित्त होते मोदी सरकारविरोधात विरोधकांनी मांडलेल्या अविश्‍वास ठरावावरील चर्चेचे. ओबामा, ट्रम्प, पुतीन यांच्यासारख्या जागतिक नेत्यांना मिठी मारणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज अचानक "जादू की झप्पी' दिल्यानंतर अवघे सभागृह स्तब्ध झाले. या घटनेनंतर मोदीही काहीक्षण गांगारून गेले होते, मिठीतून मार्गस्थ होणाऱ्या राहुल यांना त्यांनी परत जवळ बोलावून घेतले अन्‌ त्यांच्याशी छोटेखानी संवाद साधत पाठही थोपटली. 

पुरेसे संख्याबळ हाती नसतानाही "अविश्‍वास' ठरावाच्या माध्यमातून सरकारला "धडक' देणाऱ्या कॉंग्रेसने आज आपले संसदीय अस्तित्व दाखवून दिले. "तुम्ही, पप्पू म्हणून माझी कितीही टवाळी केली तरीसुद्धा माझ्या मनात तुमच्याविषयी प्रेमच आहे' हा उपरोधिक संदेशही राहुल यांनी यातून दिला. मोदींच्या मिठीतून सुटलेले राहुल आपल्या बाकावर आसनस्थ झाले आणि त्यांनी शेजारी बसलेल्या सहकाऱ्यांकडे पाहत मिश्‍किलपणे डोळा मिचकावला. राहुल यांच्या कृत्यामुळे कॉंग्रेसच्या गोटात हास्यकल्लोळ झाला. या "रागा'मिठीला पहिला आक्षेप घेतला तो अकाली दलाच्या नेत्या हरसिमरत कौर बादल यांनी. त्यांनी "आज आप कौन सा करके आए है?' असा थेट सवाल राहुल यांना केला. नेहमीप्रमाणे या घटनेनंतर इंटरनेटवरील "ट्रोलधाड' राहुल यांच्यावर अक्षरश: तुटून पडली आणि ट्विटरवर 'hugplomacy', 'pappukijhappi' चे ट्रेंड चालू झाले. 

खुद्द लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनीही यावर नापसंती व्यक्त केली. "राहुल मला मुलासारखे आहेत पण संसदेतील त्यांचे वर्तन अयोग्य होते' अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली; तर गृहमंत्री राजनाथसिंह यांनी या गळाभेटीला "चिपको' आंदोलनाची उपाधी दिली. शिवसेनेने मात्र राहुल यांचे कौतुक करत राहुल हे आता खरे राजकीय नेते बनले असून, त्यांनी पंतप्रधानांना "झप्पी' नाही तर झटका दिला आहे, अशी प्रतिक्रिया दिली. राजकारणात सत्तेचा लंबक नेहमीच अस्थिर असतो. सत्ता येते तशी जाते, हे "जाणते'पण नेत्यांच्या अंगी असले की मग संवादाचा विखार होत नाही. राहुल यांच्या मोदी झप्पीतील सिक्रेट जनतेलाही ठाऊक आहे. ये जनता सब जानती है! कारण तिही दरपाच वर्षांनी नेहमीच अशा अविश्‍वासाच्या मिठीत अडकत असते. 

 

Web Title: No confidence motion Rahul Gandhi hug pm narendra modi