लालूप्रसाद, रुडी, अखिलेश अशा दिग्गज नेत्यांच्या सुरक्षेला कात्री

वृत्तसंस्था
बुधवार, 24 जुलै 2019

केंद्र सरकारने देशभरातील महत्त्वाच्या नेत्यांच्या सुरक्षेमध्ये फेरबदल केले आहेत, यान्वये बिहार, उत्तर प्रदेशातील काही बड्या नेत्यांच्या सुरक्षेला कात्री लावण्यात आली आहे.

नवी दिल्ली : केंद्र सरकारने देशभरातील महत्त्वाच्या नेत्यांच्या सुरक्षेमध्ये फेरबदल केले आहेत, यान्वये बिहार, उत्तर प्रदेशातील काही बड्या नेत्यांच्या सुरक्षेला कात्री लावण्यात आली आहे.

राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव, उत्तर प्रदेशातील मंत्री सुरेश राणा, भाजपचे खासदार राजीवप्रताप रुडी यांना केंद्रीय यादीतून वगळण्यात आले आहे. या सर्व नेत्यांना आतापर्यंत केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) माध्यमातून सुरक्षा दिली जात होती. लोकजनशक्ती पक्षाचे खासदार चिराग पासवान यांची "सीआरपीएफ' सुरक्षा काढून घेण्यात आली असून, त्यांच्या सुरक्षेचा दर्जाही "वाय'वर आणण्यात आला आहे.

उत्तर प्रदेशातील भाजपचे वाद्‌ग्रस्त आमदार संगीत सोम, "बसप'चे नेते सतीशचंद्र मिश्रा यांच्या सुरक्षेमध्येही कपात करण्यात आली असून, बिहारमध्ये बाहुबली नेते राजेश रंजन ऊर्फ पप्पू यादव यांनाही हाच न्याय लावत त्यांचे सुरक्षा कवचही काढून घेण्यात आले आहे. बिहार आणि उत्तर प्रदेशातील माजी मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेमध्येही कपात करण्यात आली आहे. 

अखिलेश यांनाही फटका 
मुख्यमंत्री अखिलेश यादव यांची झेड प्लस सुरक्षा काढून घेतली जाणार असल्याने आता त्यांच्याभोवती ब्लॅक कॅट कमांडोंचे सुरक्षा कवच नसेल. विशेष म्हणजे त्यांचे वडील मुलायमसिंह यादव यांची झेड प्लस सुरक्षा मात्र कायम राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. केंद्रामध्ये "यूपीए'चे सरकार असताना अखिलेश यांना 2012 मध्ये हे सुरक्षा कवच बहाल करण्यात आले होते. 

तेरा नेत्यांना कवच 
सध्या देशातील तेरा महत्त्वाच्या नेत्यांना राष्ट्रीय सुरक्षा दलाचे सुरक्षा कवच आहे, यामध्ये संरक्षणमंत्री राजनाथसिंह, "यूपी'च्या माजी मुख्यमंत्री मायावती, विद्यमान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल, माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि फारूख अब्दुल्ला यांचा समावेश आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No CRPF cover for Lalu Prasad Yadav, Rajiv Pratap Rudy, Chirag Paswan anymore