कर्नाटकात कुमारस्वामींच्या पाठिंब्याबाबत काँग्रेस करणार विचार ?

वृत्तसंस्था
शुक्रवार, 25 मे 2018

अंतिम चर्चा झाली आहे. आमचे सध्याचे ध्येय हेच आहे, की बहुमत चाचणीला सामोरे जायचे आणि योग्य प्रशासन द्यायचे. तसेच मुख्यमंत्रिपदाबाबत आम्ही चर्चा करणार आहोत. त्यानंतरच पुढील निर्णय घेण्यात येईल. 

नवी दिल्ली : कर्नाटकात काँग्रेसच्या पाठिंब्यावर धर्मनिरपेक्ष जनता दलाचे (जेडीएस) सरकार सत्तेवर आले आहे. कर्नाटकात जेडीएसपेक्षा काँग्रेसच्या जागा जास्त आहेत. तरीदेखील काँग्रेसने जेडीएस नेते एच. डी. कुमारस्वामी यांना मुख्यमंत्रिपदासाठी बिनशर्त पाठिंबा दिला. मात्र, त्यानंतर आता काँग्रेस नेते आणि उपमुख्यमंत्री जी. परमेश्वरा यांनी कुमारस्वामींना 5 वर्षांसाठी पाठिंब्याबाबत काँग्रेसकडून अद्याप निर्णय घेण्यात आला नाही, असे सांगितले आहे. 

भाजप नेते बी. एस. येडियुरप्पा यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्या शपथविधी सोहळाही पार पडला होता. मात्र, बहुमत चाचणीपूर्वी येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर काँग्रेसने जेडीएस नेते कुमारस्वामींना मुख्यमंत्री करण्याची रणनीती आखली. तसेच कुमारस्वामींना बिनशर्त पाठिंबा देण्याचे जाहीर केले.

कर्नाटकात स्थापन झालेले काँग्रेस आणि जेडीएसचे सरकार त्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत असताना परमेश्वरा यांनी याबाबत विधान केले. परमेश्वरा म्हणाले, याबाबत अंतिम चर्चा झाली आहे. आमचे सध्याचे ध्येय हेच आहे, की बहुमत चाचणीला सामोरे जायचे आणि योग्य प्रशासन द्यायचे. तसेच मुख्यमंत्रिपदाबाबत आम्ही चर्चा करणार आहोत. त्यानंतरच पुढील निर्णय घेण्यात येईल. 

Web Title: No decision yet on backing HD Kumaraswamy for 5 years says G G Parameshwara