'हिंदुस्थान जिंदाबाद' आणि 'वंदे मातरम'मध्ये फरक नाही : काँग्रेस

वृत्तसंस्था
शुक्रवार, 31 मार्च 2017

"वंदे मातरम' म्हणण्यास नकार देणाऱ्या सदस्यांना सभागृहात प्रवेश न देण्याच्या मेरठ महानगरपालिकेच्या निर्णयाच्या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसने "हिंदुस्थान जिंदाबाद' आणि "वंदे मातरम' यात काहीही फरक नसल्याचे म्हणत "वंदे मातरम' म्हणण्यासाठी कोणावरही दबाव टाकण्यात येऊ नये', अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

नवी दिल्ली - "वंदे मातरम' म्हणण्यास नकार देणाऱ्या सदस्यांना सभागृहात प्रवेश न देण्याच्या मेरठ महानगरपालिकेच्या निर्णयाच्या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसने "हिंदुस्थान जिंदाबाद' आणि "वंदे मातरम' यात काहीही फरक नसल्याचे म्हणत "वंदे मातरम' म्हणण्यासाठी कोणावरही दबाव टाकण्यात येऊ नये', अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

वृत्तसंस्थेशी बोलताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ऑस्कर फर्नांडिस म्हणाले, "हा वंदे मातरम गाण्याविषयीचा प्रश्‍न आहे. ते राष्ट्रगती आहे. मात्र, जर एखादा व्यक्ती ते गाण्यास नकार देत असेल, तर "वंदे मातरम' म्हणणे कायद्याने अनिवार्य केल्याशिवाय आपण त्या व्यक्तीला दोषी समजू शकत नाहीत.' काँग्रेस नेते पी. एल. पुनिया यांनीही याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. ते म्हणाले, "मला या प्रकाराचा धार्मिक अर्थ काढायचा नाही. मात्र "हिंदुस्थान जिंदाबाद' आणि "वंदे मातरम' यात काहीही फरक नाही असे वाटते. दोन्हीही गीते देशासाठीच आहेत. मात्र, मला असे वाटते कोणावरही ते म्हणण्यासाठी दबाव आणणे चुकीचे आहे.' दरम्यान भारतीय जनता पक्षाचे नेते जगदंबिका पाल यांनी "जो व्यक्ती भारतीय आहे त्याला "वंदे मातरम' म्हणण्यात काहीही अडचण असू नये', अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

मेरठ महानगरपालिकेत मंगळवारी महापौर हरिकांत अहलुवालिया यांनी सर्व सदस्यांना "वंदे मातरम' म्हणण्यासाठी उभे राहण्याचे आवाहन केले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार "वंदे मातरम' म्हणणे अनिवार्य नसल्याचे म्हणत सभागृहातील सात मुस्लिम सदस्यांनी "वंदे मातरम' म्हणण्यास नकार दिला. या प्रकारामुळे भारतीय जनता पक्षाच्या आणि विरोधी पक्षांच्या सदस्यांमध्ये वाद निर्माण झाले. त्यामुळे नकार देणारे सात सदस्य सभागृहाबाहेर निघून गेले. त्यानंतर अहलुवालिया यांनी "वंदे मातरम' न म्हणणाऱ्या सदस्यांना सभागृहात प्रवेश न देण्यासाठीचा ठराव आवाजी मतदानाने संमत केला. या ठरावाला अद्याप सरकारची मान्यता मिळणे बाकी आहे.

Web Title: No difference between 'Hindustan Zindabad' and 'Vande Mataram' : Congress