धर्म, संप्रदायाच्या आधारावर भेदभाव नाही - राजनाथसिंह

पीटीआय
बुधवार, 23 मे 2018

धर्म आणि संप्रदायाच्या आधारावर भारत कोणासोबतही भेदभाव करत नाही, तसेच भविष्यामध्येही अशा गोष्टी घडू दिल्या जाणार नाहीत, असे प्रतिपादन गृहमंत्री राजनाथसिंह यांनी आज केले.

नवी दिल्ली - धर्म आणि संप्रदायाच्या आधारावर भारत कोणासोबतही भेदभाव करत नाही, तसेच भविष्यामध्येही अशा गोष्टी घडू दिल्या जाणार नाहीत, असे प्रतिपादन गृहमंत्री राजनाथसिंह यांनी आज केले. दिल्लीतील आर्चबिशप अनिल कोऊटो यांनी देशातील अशांत राजकीय स्थिती आणि घटनात्मक मूल्ये व धर्मनिरपेक्ष संरचनेसमोर निर्माण झालेल्या आव्हानाच्या पार्श्‍वभूमीवर आपल्या अनुयायांना 2019 मध्ये नवे सरकार यावे म्हणून प्रार्थना करण्याचे आवाहन केले होते. 

कर्नाटकातील निवडणुका होण्यापूर्वीच त्यांनी दिल्लीतील धर्मगुरू आणि धार्मिक संस्थांना उद्देशून एक पत्र लिहिले होते, त्यात याचा उल्लेख करण्यात आला होता. या पत्रामुळे राजधानातील राजकीय वर्तुळामध्ये खळबळ निर्माण झाली असून, गृहमंत्री राजनाथसिंह यांनी यावर स्पष्टीकरण देताना म्हटले आहे, की ते पत्र मी पाहिलेले नाही, पण भारतामध्ये धर्म, संप्रदाय आणि जातीच्या आधारावर भेदभाव केला जात नाही, भविष्यामध्येही अशा गोष्टी घडू दिल्या जाणार नाहीत. देशाच्या ऐक्‍याला सरकार कधीच तडा जाऊ देणार नाही. देशाचे ऐक्‍य, सर्वसमावेशकता, सार्वभौमत्व यांना कोणत्याही स्थितीत तडा जाऊ दिला जाणार नाही. परस्परांमधील मैत्रीभाव, आत्मीयता आणि सौहार्द वाढविण्यासाठी आमचे सरकार कटिबद्ध आहे.

देशाच्या धार्मिक सद्‌भावनेला तडा जाईल, असे कोणतेही कृत्य मी करणार नाही. मोदी सरकार येऊ नये म्हणून चर्चच्या माध्यमातूनच लोकांना आवाहन केले जात असेल, तर देशाला विचार करावा लागेल. दुसऱ्या धर्मातील लोकही पूजा-कीर्तन करतील. 
गिरिराज सिंह, भाजप नेते 

पंतप्रधान धर्म आणि जातींचा विचार न करता सर्वांसाठी विकासाचे काम करत आहेत. आर्चबिशप हे लोकांना फक्त प्रगतिशील विचारसरणी ठेवण्याचे आवाहन करू शकतात. 
मुक्‍तार अब्बास नक्वी, केंद्रीय मंत्री 
 

Web Title: No discrimination against anyone on basis of religion says Rajnath Singh