दुसरीपर्यंत गृहपाठ नको : मद्रास उच्च न्यायालय

वृत्तसंस्था
गुरुवार, 31 मे 2018

मुलांच्या पाठीवरील दप्तरांचे आणि डोक्‍यावरील होमवर्कचे ओझे कमी करण्यासाठी मद्रास उच्च न्यायालयाने पुढाकार घेतला आहे. आता मुलांच्या पाठीवरील दप्तरांचे ओझे वाढवू नका, तसेच इयत्ता पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांना गृहपाठदेखील देऊ नका, त्यांना बालपणाचा आनंद घेऊ द्या, त्यांच्या डोक्‍यावर कसल्याही प्रकारचा ताण येता कामा नये, असे न्यायालयाने म्हटले आहे.

चेन्नई : मुलांच्या पाठीवरील दप्तरांचे आणि डोक्‍यावरील होमवर्कचे ओझे कमी करण्यासाठी मद्रास उच्च न्यायालयाने पुढाकार घेतला आहे. आता मुलांच्या पाठीवरील दप्तरांचे ओझे वाढवू नका, तसेच इयत्ता पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांना गृहपाठदेखील देऊ नका, त्यांना बालपणाचा आनंद घेऊ द्या, त्यांच्या डोक्‍यावर कसल्याही प्रकारचा ताण येता कामा नये, असे न्यायालयाने म्हटले आहे. यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेत राज्यांना तसे निर्देश द्यावेत, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. 

""एनसीईआरटी'च्या पुस्तकांचा वापर अनिवार्य केला जावा, तसेच मुलांच्या पाठीवरील दप्तरांचे ओझे हे त्याच्या वजनाच्या दहा टक्‍क्‍यांपेक्षा अधिक असता कामा नये. मुले ही काही भारोत्तोलक नसून, तसेच ती शाळांच्या बॅगा भरण्याची कंटनरदेखील नाहीत, या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शाळांवर देखरेख ठेवण्यासाठी भरारी पथके नेमण्यात यावीत,'' असेही न्यायालयाने आपल्या आदेशांत म्हटले आहे. 

"एनसीईआरटी'ची पुस्तके

दप्तरांच्या ओझ्याबाबत तेलंगण आणि महाराष्ट्र सरकारच्या आदेशांचा हवाला देत न्या. एन. निरुबकरन यांनी म्हटले आहे, की अन्य राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील सरकारांनीदेखील मुलांच्या दप्तरांबाबत हे धोरण स्वीकारावे, तसेच "सीबीएसई'च्या प्रादेशिक अधिकाऱ्यांनी आणि "असोसिएशन ऑफ मॅनेजमेंट ऑफ प्रायव्हेट स्कूल' यांनीही केवळ "एनसीईआरटी'ची पुस्तके वापरण्यावरच भर द्यावा. 

याचिकेतील मागणी 
ज्येष्ठ विधिज्ञ एम. पुरुषोत्तमन यांच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने हे आदेश दिले. "सीबीएसई'च्या शाळांनी केवळ "एनसीईआरटीने'च प्रसिद्ध केलेली पुस्तके खरेदी करावीत, तसेच या संस्थेने निश्‍चित केलेला अभ्यासक्रम राबावावा, त्यासाठी आदेश द्यावेत, अशी मागणीही या याचिकेत करण्यात आली होती. 
 
विषयांचे असेही गणित 
इयत्ता पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी भाषाशास्त्र आणि गणिताशिवाय अन्य कोणतेही विषय शिकविले जाऊ नयेत, तसेच इयत्ता तिसरी ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी भाषाशास्त्राप्रमाणेच, समाजशास्त्रे आणि गणित हे विषय शिकविण्यात यावेत, तशा सूचना खुद्द "एनसीईआरटीने'च केल्या आहेत. "सीबीएसई'च्या शाळांनी इयत्ता पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांना गृहपाठ देऊ नये, असेही न्यायालयाने आदेशांत म्हटले आहे. 

Web Title: No Homework For Students Of Classes 1, 2: Madras High Court