केंद्रीय मंत्री म्हणतात, 'नोकऱ्यांची कमतरता नाही'

वृत्तसंस्था
रविवार, 15 सप्टेंबर 2019

उत्तर भारतीय तरुणांना रोजगार देण्याऐवजी त्यांच्या योग्यतेवर प्रश्‍न उपस्थित करण्याचा प्रकार अतिशय लाजीरवाणा आहे. 

- मायावती, बसपच्या प्रमुख

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील तरुणांमध्ये कौशल्याचा अभाव असल्याच्या केंद्रीय श्रममंत्री संतोष गंगवार यांच्या वक्तव्यावरून वाद पेटला आहे. विरोधी पक्षांनी या वक्तव्यावर कडाडून टीकास्त्र सोडले असून, गंगवार यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणी केली आहे. 

श्रममंत्री संतोष गंगवार यांनी मोदी सरकारच्या 100 दिवस पूर्तीनिमित्त बरेली (उत्तर प्रदेश) येथील कार्यक्रमामध्ये म्हटले होते की, देशात रोजगाराची अजिबात कमतरता नाही. मात्र, रोजगार मिळविण्यासाठी उत्तर भारतातील तरुणांमध्ये कौशल्याची कमतरता आहे. श्रममंत्रालयाचा कारभार हाताळत असल्यामुळे या वस्तुस्थितीची आपल्याला कल्पना असून रोजगार देणाऱ्या कंपन्यादेखील क्षमतेचा मुद्दा उपस्थित करतात, असेही गंगवार यांनी विधान केले होते. त्यांच्या विधानाने विरोधी पक्षांना कोलित मिळाले असून, कॉंग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी, बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती, आम आदमी पक्षाचे संजय सिंह यांनी गंगवार यांच्यावर कडाडून हल्ला चढवला आहे. 

कोल्हापूर : संध्यादेवी कुपेकर यांचा विधानसभा लढविण्यास नकार

प्रियांका गांधी यांनी म्हटले आहे, की पाच वर्षांहून अधिक काळ भाजपचे सरकार असताना नोकऱ्या अस्तित्वात आलेल्या नाहीत. आहेत त्या नोकऱ्या सरकारने आणलेल्या मंदीमुळे हिरावल्या जात आहेत. सरकार काही तरी करेल अशी तरुण वाट पाहत आहेत. असे असताना उत्तर भारतीयांचा अपमान करून मंत्री पळ काढत आहेत. हे खपवून घेतले जाणार नाही, असा इशाराही प्रियांका गांधींनी दिला आहे. 

उदयनराजेंच्या साताऱ्यातील भाषणातले ‘हे’ दहा मुद्दे महत्त्वाचे

आम आदमी पक्षाचे संजयसिंह यांनी गंगवार यांचे विधान म्हणजे उत्तर भारतीयांचा अपमान असल्याचे म्हटले असून, उत्तर भारतीय तरुणांमध्ये नव्हे तर या सरकारमध्येच योग्यतेची कमतरता आहे, असा टोला संजयसिंह यांनी लगावला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No job crisis North Indians lack qualifications says Santosh Gangwar