गोव्यात नेतृत्व बदल नाहीच...

No Leadership change in Goa
No Leadership change in Goa

पणजी- गेल्या बुधवारी 12 दिवसांच्या वैद्यकीय उपचारानंतर अमेरीकेहून परतलेले मुख्यमंत्री मध्यरात्री 1 वाजता आठवडाभराने पुन्हा उपचारासाठी अमेरीकेला रवाना झाले. या आठवडाभरातील केवळ एक दिवस ते गोव्यात होते तर उर्वरीत दिवस ते मुंबईच्या लिलावती इस्पितळात दाखल होते. राज्यात नेतृत्व बदलासह मंत्रीमंडऴातील बदलाची भाजपच्या गाभा समितीत मंगळवारी चर्चा झाली असली तरी दिल्लीतील वरिष्ठांकडून त्याला मान्यता मिळाली नाही. यामुळे भाजपच्या स्थानिक नेत्यांवर आजचा (ता.30) दिल्ली दौरा रद्द करण्याची वेळ आली आहे.

नगरविकासमंत्री ऍड फ्रांसिस डिसोझा यांच्यावर अमेरीकेत उपचार सुरु आहेत, वीजमंत्री पांडुरंग मडकईकर अंथरुणाला खिळून आहेत, सार्वजनिक बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर आजारातून सावरले असले तरी ते पूर्वीच्या क्षमतेने काम करण्यासाठी काही कालावधी जावा लागणार आहे. या साऱ्याचा परिणाम राज्याच्या प्रशासनावर आणि अंतिमतः सरकारबाबत जनतेच्या मनात असलेल्या प्रतिमेवर परिणाम होत असल्याची दखल भाजपने घेतली आहे. त्याचमुळे पर्यायी नेतृत्वासह, मंत्री बदलाचा विषय भाजपने चर्चेत आणला आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी काल पत्रकारांशी बोलताना दिली.

ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर काही निर्णय तातडीने घ्यावे लागतील. त्याची कल्पना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना गुरुवारी दिली जाईल, यासाठी पक्षाच्या गाभा समितीचे सदस्य त्यांची भेट घेणार आहेत. मात्र अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने दिल्ली दौरा न करण्याचे ठरविण्यात आले आहे. गाभा समितीने पर्रीकर यांची भेट घेण्याचेही ठरविण्यात आले होते. मात्र, काल मुंबईला गेलेल्यांत माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, माजी मंत्री राजेंद्र आर्लेकर, माजी मंत्री दयानंद मांद्रेकर या गाभा समिती सदस्यांचा समावेश नव्हता. त्यामुळे या विषयावर पक्षात दोन मतप्रवाह आहेत की काय अशी चर्चा सुरु झाली आहे.

ताबा पर्रीकरांकडेच 
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यापूर्वी अमेरीकेतून फाईल्स हाताळत होते त्याच पद्धतीने आताही फाईल्स हाताळतील अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयातून देण्यात आली आहे. मुख्यमंत्री मंत्रिमंडळातील दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री सुदिन ढवळीकर यांच्याकडे देणार की नवा मुख्यमंत्री हंगामी स्वरूपात नेमला जाणार याची चर्चा सुरु झाली असतानाच मुख्यमंत्री कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे. ढवळीकर यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा ताबा देण्यात येणार या प्रसारीत होत असलेल्या माहितीत तथ्य नाही असे मुख्यमंत्री कार्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com