दोन हजारची नोट बंद होणार? सरकार काय म्हणतंय?

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 10 डिसेंबर 2019

  • दोन हजारांची नोट बंद होणार?
  • सरकार म्हणते चिंता नको !

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 च्या रात्री अचानकपणे जाहीर केलेल्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर लोकांच्या मनात याच्या पुनरावृत्तीची जबरदस्त धास्ती बसल्याचे दिसत असून, आता दोन हजाराच्या नोटाही अचानक बंद करण्याचे धक्कातंत्र हे सरकार देऊ शकते अशी जोरदार चर्चा आहे. मात्र "असे काही घडणार नसून काळजीचे कारण नाही,' असे केंद्राने आज राज्यसभेत सांगितले. दुसरीकडे नोटाबंदीमागील ठळक कारणांत ज्या काळ्या पैशाचा उल्लेख मोदींनी केला होता, त्याचा नेमका आकडाच सरकारला अजूनही माहिती नसल्याचीही कबुली केंद्राने स्वतःच दिली आहे.

समाजवादी पक्षाचे विश्‍वंभर प्रसाद निषाद यांनी हा प्रश्‍न उपस्थित करताना, दोन हजाराच्या नोटा बंद करून एका हजाराच्या नव्या नोटा सरकार आणणार आहे का, असे विचारले होते. अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी प्राथमिक उत्तर देताना, दोन हजाराच्या नोटा बंद होणार नाहीत असे स्पष्ट केले. अर्थमंत्री निर्मला सीतारामन याही उपस्थित होत्या. नोटाबंदीचा उद्देश काळा पैसा बाहेर काढणे, दहशतवाद्यांना होणारा वित्तपुरवठा थांबविणे व करसंकलनाचा पाया विस्तारणे हा होता, असे सांगून ठाकूर म्हणाले, की नव्याने नोटाबंदीचा कोणताही विचार सरकारसमोर नाही.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दरम्यान, नोटाबंदीनंतर नकली नोटांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर घटले असा दावा सीतारामन यांनी एका लेखी उत्तरात केला. रिझर्व्ह बॅंकेच्या आकड्यांनुसार 2016-17 मध्ये बॅंकिंग व्यवस्थेने 7 लाख 62 हजार 72 नकली नोटा पकडल्या. 2017-18 मध्ये त्यांची संख्या घटून 5 लाख 22 हजार 783 व 2018-19 मध्ये 3 लाख 17 हजार 389 पर्यंत खाली आली आहे. मागील आर्थिक वर्षात डिजिटल व्यवहारांमध्ये 51 टक्के वाढ झाल्याचाही दावा सीतारामन यांनी केला आहे. 17-18 मध्ये 2,071 कोटी डिजिटल व्यवहार झाले. 2018-19 मध्ये हा आकडा 3,134 कोटींवर पोचल्याचेही त्या म्हणाल्या.

धक्कादायक ! चोर सोडून संशयाला बेड्या

काळ्या पैशाचा पत्ताच नाही !
देशविदेशांत भारतीयांचा नेमका काळा पैसा किती, यावर सरकार पूर्ण अनभिज्ञच आहे. ठाकूर यांनी स्वतःच एका लेखी उत्तरात ही स्पष्ट कबुली दिली. कॉंग्रेसचे रंजीब विस्वाल यांच्या प्रश्‍नाच्या उत्तरात ठाकूर यांनी, भारतीयांच्या काळ्या पैशांबाबतच्या माहितीच्या देवाणघेवाणीसाठी 130 देशांबरोबर करार केले, त्यात काळ्या पैशाबाबतच्या माहितीची व खातेदारांची नावे कळविण्याचीही तरतूद आहे, या दिवंगत जेटलींनी दिलेल्या माहितीची पुनरावृत्ती केली. मात्र काळा पैसा किती यावर ठाकूर यांचे उत्तर आहे, "देशविदेशात नेमका काळा पैसा किती याचा सरकारलाही अंदाज नाही.'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No need to worry Minister on reports of Centre withdrawing Rs 2000 notes