Consumer Rights : आता बिलासाठी दुकानदाराला मोबाईल नंबर देणं बंद; सरकारचा मोठा निर्णय! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

no retailer ask customer for mobile number for bill says consumer affairs ministry

Consumer Rights : आता बिलासाठी दुकानदाराला मोबाईल नंबर देणं बंद; सरकारचा मोठा निर्णय!

बऱ्याचदा आपण कुठल्यादी दुकानात खरेदी केल्यानंतर बिल देताना दुकानदार तुमचा फोन नंबर मागतात. अनेकजण अशा वेळी आपला फोन नंबर देऊनही टाकतात. मात्र आता ग्राहक मंत्रालयाकडून हा प्रकार बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

आता फक्त ग्राहकांची इच्छा असेल तरच दुकानदारास फोन नंबर मिळू शकेल अन्यथा त्यासाठी ग्राहक थेट नकार देऊ शकतील. तसेच फोन नंबरसाठी दुकानदार ग्राहकांवर दबाव टाकू शकत नाहीत.

ग्राहक मंत्रालयाचे सचिव रोहित कुमार सिंग यांनी सांगितले की ग्राहकांकडून अनेक तक्रारी मिळाल्यानंतर केंद्र सरकारने अॅडव्हायजरी जारी केली आहे. मोबाईल नंबर दिला नाही म्हणून काही रिटेलर्स सर्व्हिसेस देण्यासाठी नकार देतात अशा प्रकारच्या तक्रारी ग्राहकांकडून मिळाल्या आहेत. या तक्रारींमध्ये ग्राहकांचे म्हणणे होते की, रिटेलर्स किंवा दुकानदार हे काँटॅक्ट डिटेल्स नसतील तर बिल जनरेट करता येणार नाही असे सांगतात. यानंतर मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे

कंज्यूमर प्रोटेक्शन अॅक्ट अंतर्गत ही चुकीची प्रॅक्टीस आहे. रोहित कुमार सिंह यांनी सांगितले की, दुकानदार हे ग्राहकांची इच्छा नसेल तर त्यांचा मोबाईल नंबर घेऊ शकत नाहीत. या प्रकारामुळे ग्राहकांना होणाऱ्या असुविधेचा विचार करुन रिटेल इंडस्ट्री आणि CII, FICCI आणि ASSOCHAM सारख्या संस्थांना अॅडव्हायजरी जारी करण्यात आली आहे.

नंबर कशासाठी घेतात?

शॉपिंगनंतर बिल घेताना ग्राहकांना मोबाईल नंबर मागीतल्यास दुकानदाराच्या डेटाबेसमध्ये ग्राहकांचा नंबर फीड होतो. यामुळे नंतर ग्राहकांना ऑफर्ससाठी फोन किंवा मेसेज केले जातात. या कॉल्स आणि मेसेजेसमुळे बऱ्याचदा ग्राहकांना मनस्ताप देखील सहन करावा लागतो. हे प्रकार रोखण्यासाठी सरकारने आता अॅडव्हायजरी जारी केली आहे.