नो वॉर नो पीस...

श्रीराम पवार
शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016

पाकिस्तानी लष्काराच्या पाठबळावर झालेल्या दहशतवाद्यांच्या हल्ल्यात तीन भारतीय जवान काश्‍मीरमधील माछिलजवळ हुतात्मा झाले आणि त्यातील एकाची विटंबनाही केल्याचे निष्पन्न झाले. हे पाकिस्तानच्या चिथावणीखोर वाटचालीला धरुन असले तरी सर्जिकल हल्ल्यानंतर पाकला जरब बसेल या जाणिवपूर्वक पसरवलेल्या गृहितकातील पोकळपणाही दाखवणारे आहे. आता आम्हीही चोख उत्तर देऊ, लष्कराला मुक्तहस्ते कारवाईची परवानगी दिली आहे अशा ठेवणीतल्या प्रतिक्रिया सरकारी पोपटांकडून आणि त्याच्या राजकीय समर्थकांतून येतील. सरकार कोणाचंही असो आतापर्यंत अशा घटनांनंतर त्याच प्रकारे बदला घेतला जातो.

पाकिस्तानी लष्काराच्या पाठबळावर झालेल्या दहशतवाद्यांच्या हल्ल्यात तीन भारतीय जवान काश्‍मीरमधील माछिलजवळ हुतात्मा झाले आणि त्यातील एकाची विटंबनाही केल्याचे निष्पन्न झाले. हे पाकिस्तानच्या चिथावणीखोर वाटचालीला धरुन असले तरी सर्जिकल हल्ल्यानंतर पाकला जरब बसेल या जाणिवपूर्वक पसरवलेल्या गृहितकातील पोकळपणाही दाखवणारे आहे. आता आम्हीही चोख उत्तर देऊ, लष्कराला मुक्तहस्ते कारवाईची परवानगी दिली आहे अशा ठेवणीतल्या प्रतिक्रिया सरकारी पोपटांकडून आणि त्याच्या राजकीय समर्थकांतून येतील. सरकार कोणाचंही असो आतापर्यंत अशा घटनांनंतर त्याच प्रकारे बदला घेतला जातो. तो लष्कराच्या मनोबलाचा आणि प्रतिष्ठेचा मुद्दा असतो. सहाजिकच भारतीय लष्कराकडून तसं प्रत्युत्तर दिलं जाईलच. पण, पाकिस्तानसारख्या नाठाळ शेजाऱ्याला हाताळणं केवळ एखाद्या सर्जिकल स्ट्राईकच्या आवाक्‍यापलिकडचं आहे. भारत आणि पाकिस्तान दरम्यानच्या ताबारेषेवरची स्थिती युध्दापेक्षा फार वेगळी नाही आणि दोन देशात "नो वॉर नो पीस' अशी अवस्था तयार झाली आहे. केवळ लष्करी ताकदीच्या प्रयोगांनी ती बदलता येत नाही, हे दोन्हीकडच्या धुरीणांना कळतच. पण वास्तवात राहण्यापेक्षा दोन्हीकडून तापवलेलं जनमत मॅनेज करणं हेच महत्वाचं बनतं आहे.

भारतीय लष्करानं पाकव्याप्त काश्‍मिरात केलेला हल्ला सर्जिकल स्ट्राईक म्हणून गाजवला गेला. त्याचं स्वरुप, पध्दती सर्जिकल स्ट्राईकची असली तरी असे हल्ले गोपनीयच ठेवायचे, ही रीत पहिल्यांदाच नाकारली गेली. त्यावर उलटसुलट चर्चेची आवर्तनं झाली आहेत. हा हल्ला केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजप सरकारची आणि त्याहीपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या त्यांनीच तयार केलेल्या प्रतिमेची आवश्‍यकता होती. पाकिस्तानच्या पाठबळावर दहशतवादी रोज थपडा मारताहेत आणि आणि एका मुंडक्‍याच्या बदल्यात दहाचे आश्‍वासन देऊन सत्तेवर आलेले तीच जुनी दहशतवाद्यांच्या निषेधाची भाषा बोलताहेत. हे फार काळ सरकराला परवडणारं नव्हतं. कधी नव्हे ते दुबळेपणाचा आरोप सुरु झाला आणि खिल्लीही उडवली गेली. सर्जिकल स्ट्राईक हा त्यावरचा नामी उपाय ठरला. अर्थात देशात आत्मविश्‍वास जागवण्यासाठीही त्याचा उपयोग झाला. पाकिस्तानाला लगेच प्रत्युत्तर देणं कठीण बनावं असं आंतरराष्ट्रीय मताचं व्यवस्थापनही झालं. असा हल्ला केल्याचं जाहिरपणे सांगण्याचं धाडस आणि त्यानंतर जागतिक पातळीवर हल्लेखोर ठरवले जाऊ नये, यासाठी उचललेल्या पावलांसाठी सरकारचं कौतुकही स्वाभाविक होतं. याच वेळेस या एका धाडसी कृतीनं पाकिस्तानला बचावात जावे लागेल, असे सारे सरकार समर्थक आणि मोदीप्रेमी सांगत होते. आमच्या प्रदेशात हल्ला झालाच नाही, असा बचावात्मक पवित्रा हल्ल्यानंतर लगेचच पाकला घ्यावा लागला हे खरं पण तो तेवढ्यापुरताच होता. त्या हल्ल्यानंतर भारत-पाक प्रत्यक्ष ताबारेषेवरची स्थिती बिघडलेलीच आहे. इतकी की 2003 चा प्रत्यक्ष ताबारेषेवरील युध्दविराम अर्थहीन बनला आहे. दोन्ही बाजूंनी गोळीबार आणि दोन्हीकडून आधी दुसऱ्यानं गोळीबार सुरु केला आणि आम्ही चोख प्रत्यूत्तर दिलं हे दावे नित्याचे बनले आहेत. सर्जिकल स्ट्राईकनंतर अशा गोळीबारात 17 जवान हुतात्मा झाले. उरीतील दहशतवादी हल्ला पाक पुरस्कृत होता आणि त्यात 19 जवानांना प्राण गमावावे लागले. म्हणून सर्जिकल स्ट्राईक केले. मात्र त्यामुळे पाककडून हल्ले आणि लष्करी-नागरी हानीही थांबलेली नाही. सहाजिकच पाकला असा झटका बसला की हल्लेच थांबतील हे पसरवलेलं गृहितक प्रचारी होतं त्याला वास्तवाचा आधार नव्हता हेच स्पष्ट होतं.

सर्जिकल स्ट्राईकनं पाकिस्तानची कोंडी केली होती. मात्र त्यानंतरही हल्ले सुरुच राहिल्याने त्या सर्जिकल स्ट्राईकनं काय साधंल असाच प्रश्‍न विचारला जाऊ लागला आहे. सरकार समर्थकांना त्यांच्या रुढ चालीनुसार असा प्रश्‍न विचारणाऱ्याला देशविरोधी ठरवून मोकळे होता येईल. पण या प्रश्‍नाला तूर्त तरी उत्तर नाही. सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकच्या कुरापती वाढण्याची शक्‍यता उघड होती. एक तर पाकिस्तानात लष्कराचं वर्चस्व सर्वज्ञात आहे. आजघडीला मुलकी नेतृत्व करणारे पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ अत्यंत दुबळ्या स्थितीत आहेत. पनामा पेपर्समध्ये शरीफ कुटूंबातील नावे समोर आल्याने त्यांच्या अडचणीत भरच पडली आहे. लष्करच तारणहार आहे ही मानसिकता दीर्घकाळ तिकडे रुजवली गेली आहे आणि या लष्कराचे प्रमुख जनरल राहिल शरीफ यांची निवृत्ती तोंडासमोर आहे. पाकिस्तानचा कोणताही जनरल भारताने सर्जिकल स्ट्राईकसारखी थप्पड लगावल्यानंतर काहीही न करता पदावरुन गेला अशी प्रतिमा सोडण्याची शक्‍यता नाही. दुसरीकडे फार मोठ्या प्रमाणात संघर्ष परवडणरा नाही आणि जगही त्यासाठी पाकच्या बाजूनं उभं राहण्याची शक्‍यता नाही याची जाणीव असलेल्या पाकच्या लष्करानं सीमा धगधगती ठेवण्याचा मार्ग अवलंबला आहे. रोजचा गोळीबार आणि काश्‍मिरमध्ये दहशतवाद्यांच्या कारवाया हे चित्र गडद बनत चालले आहे. तीन जवानांचा मृत्यू आणि त्यातील एकाची विटंबना हा त्याचाच भाग आहे. जवानाच्या मृतदेहाची विटंबना हा भारतिय लष्कराला उचकावण्याचा प्रयत्न आहे. या प्रकारची ही अलिकडची दुसरी घटना आहे. अशाच प्रकारे 2013 मध्ये हेमराज या जवानाचे शिर तोडल्याचे समोर आले होते तेंव्हा मौनी असा आरोप असलेल्या मनमोहन सिंगांपासून साऱ्यांनी संताप व्यक्त केला होता. जगातल्या सगळ्या बड्या देशांनीही त्याचा निषेध केला होता. "एकाच्या बदल्यात दहा आणा' ही मागणी त्याच वेळी तत्कालिन विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी केली होती. सारे भाजप नेते सरकारच्या दुबळेपणामुळेच पाकच्या लष्कराचे भारतीय जवानाचे शीर तोडण्याचे धाडस झाल्याचे निदान करत होते. आता अजून तरी कणखर पंतप्रधानांची काही प्रतिक्रिया आलेली नाही. सरकार नोटबंदीचा त्रास राष्ट्रवादाशी जोडण्याच्या खटपटीत. तर विरोधी पक्ष हाच त्रास सरकराविरोधात संघटित करण्यात गर्क. यामुळे सीमेवरच्या अत्यंत गंभीर घडामोडींचीही चर्चाविश्‍वात फारशी दखल घेतली जात नाही. लष्कर अपेक्षेप्रमाणे प्रत्त्युत्तर देईल. ताबा रेषेपलिकडे पाकच्या अनेक चौक्‍यांवर जोरदार हल्ले केल्याच्या आणि त्यात काही पाक सैनिक ठार झाल्या बातम्याही येऊ लागल्या आहेत. 2013 च्या घटनेनंतर सरकार गप्प राहिल्याचे आरोप होत राहिले. मात्र लष्करानं त्याच भाषेत उत्तर दिल्याची आठवण त्यावेळचे लष्करप्रमुख विक्रम सिंग यांनी त्यांच्या निरोपाच्या समारंभात करुन दिली होती. त्याचा कोणी सर्जिकल स्ट्राईक म्हणून गाजवाजा केला नव्हता इतकचं.

मुद्दा केवळ प्रत्युत्तराच्या कारवाईचा नाही. तर सर्जिकल स्ट्राईकनं पाक बचावाच्या पवित्र्यातच राहिल या गृहितकाच्या फोलपणातला आहे. भारताची सहनशिलता अंतहीन नाही. हे दाखवण्यासाठीची कृती म्हणून सर्जिकल स्ट्राईक यशस्वीच होता. मात्र त्यानंतर सुरु असलेला रोजचा संघर्ष हाताळणं हे आव्हान बनत आहे. सीमेवरचा नित्याचा तणाव, गोळीबार हे नवं वास्तव तयार झालं आहे. दुसरीकडं निर्णायक युध्दाची शक्‍यताही नाही आणि उभय बाजूंची इच्छाही नाही. सर्जिकल स्ट्राईकच्या परिणामांची मर्यादा लक्षात आल्यानंतरच्या या स्थितीत दहशतवाद आणि चर्चा एकाच वेळी शक्‍य नाही या मांडणीचं सध्याचं आवर्तन आणखी किती काळ सुरु राहणार इतकचं औत्सुक्‍याचं.

Web Title: No war no peace