खूशखबर! गॅस सिलिंडर सलग दुसऱ्यांदा झाले स्वस्त

वृत्तसंस्था
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसच्या किमती घसरल्यानं ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. विनाअनुदानित सिलिंडरच्या दरात 62.50 रुपयांची कपात केली आहे.

नवी दिल्ली : घरगुती गॅस सिलिंडरबाबत पुन्हा एक आमनंदाची बातमी आहे. लागोपाठ दुसऱ्या महिन्यात घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात मोठी कपात करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसच्या किमती घसरल्यानं ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. विनाअनुदानित सिलिंडरच्या दरात 62.50 रुपयांची कपात केली आहे.

यापूर्वी जुलैमध्ये विनाअनुदानित गॅस सिलिंडरचे दर 100.50 रुपयांनी कमी करण्यात आले होते. त्यामुळे दोन महिन्यात एकूण मिळून विनाअनुदानित प्रति गॅस सिलिंडरमध्ये 163 रुपयांची कपात करण्यात आली आहे.

इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या माहितीनुसार, विनाअनुदानित घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरची बाजारातील किंमत आता 574.50 रुपये असेल. सिलिंडरचे हे नवे दर बुधवारी मध्यरात्रीपासून लागू करण्यात आले आहेत.

गेल्या महिन्यात विना अनुदानित घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत 100.50 रुपयांची कपात करण्यात आली होती. 1 जुलैपासून हे गॅस सिलिंडरचे हे नवे दर लागू करण्यात आले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात दरकपात झाल्याने आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत मजबूत झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. एलपीजी 14.2 किलो किमतीच्या घरगुती गॅस सिलिंडरमध्येच ही दरकपात केली आहे. अनुदानित सिलेंडरची खरेदी करताना बाजारमूल्याप्रमाणे पैसे द्यावे लागणार आहेत. मात्र, सिलिंडरचे अनुदान बँकेत जमा झाल्यास प्रत्येक सिलेंडरसाठी 142.65 रुपये अनुदान मिळेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: non subsidised LPG price decrease by over 62 rs per cylinder form august 1