अवकाळीचा पाच राज्यांना तडाखा; 50 जण मृत्युमुखी

पीटीआय
गुरुवार, 18 एप्रिल 2019

महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश, मणिपूर आणि गुजरातमधील काही भागांना आज विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह झालेल्या अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा बसला असून, त्यात एकूण 50 जणांचा बळी गेला असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

जयपूर, भोपाळ, अहमदाबाद : महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश, मणिपूर आणि गुजरातमधील काही भागांना आज विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह झालेल्या अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा बसला असून, त्यात एकूण 50 जणांचा बळी गेला असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका राजस्थान आणि गुजरातला बसला असून, या दोन्ही राज्यांमध्ये पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे.

अवकाळी पावसामुळे राजस्थानात सर्वाधिक 21 जण मृत्युमुखी पडले आहेत. मध्य प्रदेशात 15 जणांचा, तर गुजरातमध्ये 10 जणांचा मृत्यू झाला असून, महाराष्ट्रात तीन जण मृत्युमुखी पडले आहेत. अवकाळी पावसाचा तडाखा बसलेल्या राज्यांतील परिस्थितीवर केंद्र सरकार लक्ष्य ठेवून आहे. अवकाळीचा फटका बसलेल्या राज्यांना आवश्‍यक ती मदत करण्यास केंद्र सरकार तयार आहे, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी दिली.

अवकाळी पावसामुळे राजस्थानात 21 जण मृत्युमुखी पडल्याची माहिती राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागाच्या सचिवांनी दिली. मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत राज्य सरकारकडून देण्यात येईल, असे ही त्यांनी स्पष्ट केले. राजस्थानात अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, राज्यातील नुकसानीचा आढावा घेतला जात आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. 
पुढील 24 तासांमध्ये वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्‍यता हवामान विभागाने वर्तविली आहे. गुजरातमधील हिम्मतनगर येथील पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी उभारण्यात आलेल्या मंडपाच्या काही भागांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. 

"पीएमओ'कडून सारवासारव 

गुजरातमध्ये अवकाळी पावसामुळे मृत्युमुखी पडलेल्यांबाबत दुःख व्यक्त करीत राज्यासाठी मदतीची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून केली. त्यानंतर मोदी हे फक्त गुजरातची काळजी करीत असून, इतर राज्यांबाबत तो दुजाभाव करीत आहेत, असा आरोप मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी केला. त्यानंतर पंतप्रधान कार्यालयाने ट्विटद्वारे सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.

मध्य प्रदेश, राजस्थान, मणिपूर आणि देशातील इतर भागांत अवकाळी पावसामुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाइकांना पंतप्रधान साह्यता निधीतून प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत देण्यात येईल, असे "पीएमओ'कडून जाहीर करण्यात आले. 

Web Title: Nonseasonal Rain Affected in Five States 50 Peoples Died