
Khushboo Sundar: मी जे बोलले त्याची लाज वाटली नाही...वडिलांच्या गैरवर्तनावर खुशबू सुंदर पुन्हा बोलल्या
गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्या आणि अभिनेत्री खुशबू सुंदर चर्चेत आहेत. त्यांनी '८ वर्षांची असल्यापासून वडील माझं लैंगिक शोषण करत होते', असा धक्कादायक खुलासा दोन दिवसांपूर्वी केला होता. त्यानंतर अनेक तर्क वितर्क लावण्यात येऊ लागले. उलट सुलट चर्चा होऊ लागल्या. दरम्यान, त्यांनी यावर पुन्हा बोलत 'मी जे बोलले त्याची लाज वाटली नाही. माझा उद्देश वेगळा होता.' असे स्पष्टीकरण दिलं आहे.
मी कोणतही धक्कादायक विधान केलेलं नाही. मला वाटते की, माझा हा एक प्रामाणिकपणा होता जो मी सर्वांसमोर आणला. मी जे बोलले त्याची मला लाज वाटत नाही. कारण हे माझ्यासोबत घडले आहे. मला वाटते की अपराध्याला त्याची चुक कळली पाहिजे.
तसेच, हे सांगण्यामागे माझा उद्देश वेगळा होता. तुम्ही खंबीर राहा. सक्षम राहा. स्वतःला कमी लेखू नका. आपलं आयुष्य संपलं असं मनात कधी आणु नका. असा संदेश त्यांनी लैंगिक शोषणाला बळी पडणाऱ्या महिलांना दिला आहे.
Khushboo Sundar: भाजप नेत्याचं वडिलांकडून लैंगिक शोषण; मुलाखतीतून खुलासा
मला वाटते की महिलांनी याबद्दल बोलणे आवश्यक आहे आणि त्यांना सांगणे आवश्यक आहे की माझ्यासोबत हे घडले आहे. काहीही झाले तरी मी माझा प्रवास सुरूच ठेवेन. असही खुशबू सुंदर यावेळी म्हणाल्या.
नेमकं काय आहे प्रकरण?
दोन दिवसांपूर्वी सुंदर यांनी स्वतःला आलेला वाईट अनुभव एका मुलाखतीत सांगितला. 'मी आठ वर्षांची असल्यापासून माझे वडील माझं लैंगिक शोषण करत होते. जेव्हा मी १५ वर्षांची झाले, तेव्हा माझ्यामध्ये त्यांच्याविरोधात बोलण्याची हिंमत आली. कुटुंबातील इतर सदस्यांना त्रास सहन करावा लागू नये, म्हणून मी आठ वर्षं गप्प राहिले.
मला एका गोष्टीची कायम भीती वाटत राहायची. ‘काहीही झालं तरी माझा पती म्हणजे परमेश्वर आहे’ अशा मानसिकतेची माझी आई माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवणार नाही. पण जेव्हा मी १५ वर्षांची झाले, मी वडिलांविरोधात बोलायला सुरुवात केली.'' असा धक्कादायक खुलासा सुंदर यांनी केला होता.