राम मंदिरासाठी भीक मागत नाही, दिलेली वचनं पाळा : आरएसएस

वृत्तसंस्था
रविवार, 9 डिसेंबर 2018

''राम मंदिराच्या उभारणीसाठी आम्ही भीक मागत नाही. आम्ही आमच्या भावना व्यक्त करत आहोत. देशाला आता 'राम राज्य' हवे आहे''.

- सुरेश भैयाजी जोशी, सरकार्यवाहक, आरएसएस

नवी दिल्ली : ''राम मंदिराच्या उभारणीसाठी आम्ही भीक मागत नाही. तर दिलेली वचनं पाळावीत. यासाठी सरकारने कायदा करावा आणि राम मंदिराची उभारणी करावी'', अशी मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरकार्यवाहक सुरेश भैयाजी जोशी यांनी आज (रविवार) केली.  

रामलीला मैदान येथे विश्वू हिंदू परिषद (विहिंप) आयोजित एका रॅलीला संबोधित करताना जोशी बोलत होते. ते म्हणाले, ''सध्या सत्तेत असलेल्या लोकांनी राम मंदिर उभारणार असल्याचे वचन दिले होते. त्यामुळे आता त्यांनी लोकांच्या मागणीकडे लक्ष दिले पाहिजे. अयोध्येत राम मंदिर उभारणीची मागणी पूर्ण केली पाहिजे''. तसेच ते पुढे म्हणाले, ''राम मंदिराच्या उभारणीसाठी आम्ही भीक मागत नाही. आम्ही आमच्या भावना व्यक्त करत आहोत. देशाला आता 'राम राज्य' हवे आहे'', अशा शब्दांत त्यांनी भाजपवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. 

दरम्यान, राम मंदिर प्रकरणावरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयात पुढील महिन्यात जानेवारीमध्ये होणार आहे. न्यायालयाने आपली प्रतिष्ठा राखली पाहिजे, असेही जोशी म्हणाले.

Web Title: Not begging for Ram Mandir just fulfil your promise says RSS leader Suresh Bhaiyyaji Joshi