नोटाबंदीची घर विक्रीला घरघर

वृत्तसंस्था
सोमवार, 13 फेब्रुवारी 2017

मुंबई, पुण्याला कमी झळ
नऊ शहरांपैकी मुंबई आणि पुण्यातील बांधकाम व्यवसायाला तुलनेने कमी झळ बसली. तिसऱ्या तिमाहीत मुंबईसह हैदराबाद, बंगळूर आणि चेन्नई या शहरांमधील घरांच्या विक्रीत सरासरी 20 टक्के घट नोंदवण्यात आली. याच काळात पुण्यातील विक्रीत केवळ 12 टक्‍क्‍यांची नोंद झाल्याचे अहवालात म्हटले आहे. नोटाबंदीची इतर सात शहरांच्या तुलनेत मुंबई आणि पुण्याला कमी झळ बसली.

नवी दिल्ली : मंदीने हैराण झालेल्या बांधकाम व्यवसायाचे नोटाबंदीने कंबरडे मोडल्याचे समोर आले आहे. नोटाबंदीने काळा पैसा बाहेर येणार असून, यात घरांच्या किमती कमी होऊ शकतात, या आशेने बहुतांश ग्राहकांनी घर खरेदीचा बेत पुढे ढकलला. त्याचबरोबर रोकड टंचाईचाही खरेदीवर परिणाम झाला. नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये घरांच्या विक्रीत सरासरी 40 टक्‍क्‍यांची घट झाली.

देशातील प्रमुख नऊ शहरांमधील घर विक्रीला नोटाबंदीची झळ बसली आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बड्या विकसकांनी सोने-चांदीची नाणी, ग्राहकपपयोगी वस्तू, मोटार, हॉलिडे पॅकेज आदी सवलतींची खैरात केली. मात्र, घरांच्या किमती आणखी कमी होतील, असा अंदाज अनेक संस्थांनी वर्तवल्याने ग्राहकांनी वाट पाहण्याचा पवित्रा घेतला. परिणामी, मागणीत मोठी घसरण नोंदवण्यात आली. "प्रॉपटायगर डॉटकॉम' या संकेतस्थळाच्या अहवालानुसार जुलै ते ऑक्‍टोबर या कालावधीत दरमहा सरासरी 19 हजार घरांची विक्री झाली आणि 18 हजार नवी घरे विक्रीसाठी उपलब्ध झाली होती. मात्र, नोटाबंदी लागू झाल्यानंतर विक्रीमध्ये आणि नव्या घरांच्या उपलब्धेवर परिणाम झाल्याचे या अहवालात म्हटले आहे.

गुडगाव, नोएडा, मुंबई, पुणे, बंगळूर, हैदराबाद, चेन्नई, कोलकता आणि अहमदाबाद या नऊ शहरांमधील विक्रीत सरासरी 40 टक्के आणि नव्या घरांच्या उपलब्धतेत 49 टक्‍क्‍यांची घट झाल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे. ऑक्‍टोबर ते डिसेंबर या तिमाहीचा विचार करता घरांच्या विक्रीत गेल्या वर्षाच्या तुलनेत 20 टक्‍क्‍यांची घसरण नोंदवण्यात आली. ऑक्‍टोबर ते डिसेंबर या तिमाहीत 43 हजार 512 घरांची विक्री झाली. गत वर्षी याच तिमाहीत 54 हजार 721 घरांची विक्री झाली होती.

Web Title: note ban affects housing sector