संघाला आता शिवराजसिंहही नकोसे!

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 18 डिसेंबर 2018

तब्बल दीड दशकभर मध्य प्रदेशावर राज्य केलेले ज्येष्ठ भाजप नेते व माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना घर फिरले की घराचे वासेही कसे फिरू लागतात, याचा दाहक अनुभव घ्यावा लागण्याची स्पष्ट चिन्हे आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपचा विधानसभेत पराभव होताच चौहान यांचेही ग्रहमान फिरले आहे.

नवी दिल्ली : तब्बल दीड दशकभर मध्य प्रदेशावर राज्य केलेले ज्येष्ठ भाजप नेते व माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना घर फिरले की घराचे वासेही कसे फिरू लागतात, याचा दाहक अनुभव घ्यावा लागण्याची स्पष्ट चिन्हे आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपचा विधानसभेत पराभव होताच चौहान यांचेही ग्रहमान फिरले आहे.

केंद्र सरकारने केलेल्या मागासवर्गीय संरक्षण कायद्याचा फटका बसून मध्य प्रदेशात भाजपच्या हक्काच्या सवर्ण मतपेढीने पाठ फिरविल्याचा संघाचा ग्रह झाला असून, त्यामुळेच आता विरोधी पक्षनेतेपदही शिवराज यांच्याऐवजी नरोत्तम मिश्रांसारख्या एखाद्या उच्चवर्गीय भाजप नेत्याकडे द्यावे असे मतप्रदर्शन संघवर्तुळातून सुरू झाले आहे. मध्य प्रदेशच नव्हे, तर छत्तीसगड व राजस्थानच्या माजी मुख्यमंत्र्यांनाही आता दिल्लीत बोलावून घ्यावे, असेही संघाचे मत असल्याची माहिती समोर आली आहे.

मध्य प्रदेशात शिवराजसिंह यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या भाजपने अँटी इन्कम्बसी असूनही कॉंग्रेसला जोरदार टक्कर दिली व निसटता पराभव स्वीकारावा लागला. मात्र अनेक जागांवर भाजपला सवर्णांच्या रोषाचाही फटका बसल्याचे मत भाजपमध्ये व्यक्त होत आहे. दिल्लीत भाजप नेतृत्वाकडे आलेल्या एका पराभव विश्‍लेषण अहवालानुसार मोदी सरकारने न्यायालयाचा निर्णय डावलून केलेल्या एससी-एसटी कायद्यामुळे मध्य प्रदेशात सवर्णांनी आंदोलने सुरू केली. त्यातच शिवराजसिंह यांनी, "दलितांबाबतचा केंद्राचा कायदा बदलणारा कोण माई का लाल आहे,' असे विधान केल्याने आगीत तेल पडले. भाजपचा हा हक्काचा मतदार दूर गेल्याने जवळपास आठ ते दहा जागांवर भाजपचा पराभव झाला. म्हणजे "नोटा'मुळे झाले तेवढेच नुकसान सवर्णांच्या नाराजीने झाले, असे मत या अहवालात मांडले गेल्याचे समजते.

भाकरी उलटावी!
मध्य प्रदेशात विरोधी बाकांवर बसतानाही भाजपने "भाकरी उलटावी' असे मत संघवर्तुळात व्यक्त होत आहे. शिवराजसिंह यांच्याऐवजी विरोधी पक्षनेतेपद एखाद्या सवर्ण नेत्याकडे देऊन आपत्ती व्यवस्थापन करण्याचा प्रस्ताव त्यातूनच समोर आले. संघालाही तो मान्य असल्याचे सूत्रांनी नमूद केले. शिवराजसिंह मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री नरोत्तम मिश्रा किंवा गोपाल भार्गव यांची नावे यासाठी सध्या आघाडीवर आहे. विशेष म्हणजे निकाल लागल्यावर लगेचच भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी मिश्रा यांना दिल्लीत बोलावून त्यांच्याशी कानगोष्टी केल्याचीही माहिती समोर आली आहे.

Web Title: Now RSS wont Shivraj Singh also in Madhya Pradesh as a opposition leader