‘एनआरसी’ संपूर्ण देशात राबविणार - अमित शहा 

amit shah
amit shah

नवी दिल्ली -‘‘राष्ट्रीय नागरिकता नोंदवही म्हणजेच ‘एनआरसी’मध्ये धर्माच्या आधारावर भेदभाव करण्यात आलेला नाही किंवा येणारही नाही व ही प्रक्रिया देशभरात राबविण्यात येईल,’’ असे गृहमंत्री अमित शहा यांनी आज राज्यसभेत सांगितले. विशिष्ट धर्माच्या लोकांना यामुळे घाबरण्याचे कारण नाही व देशाच्या सर्व अधिकृत नागरिकांची ‘एनआरसी’मध्ये नोंद व्हावी यासाठीच ही प्रक्रिया राबविण्यात येत असल्याचे शहा यांनी स्पष्ट केले. 

काँग्रेसचे सैद नासीर हुसैन यांनी शहा यांच्या कोलकत्यातील भाषणाचा संदर्भ देऊन शंका उपस्थित केली की, मुसलमान सोडून बाकीच्या ५-६ धर्मांच्या नागरिकांना भारताची नागरिकता मिळेल, असे तुम्ही म्हणाला होतात. ते बेकायदा राहणारे असतील तरी त्यांना भारताचे नागरिकत्व मिळेल व मुसलमानांना ते मिळणार नाही, असा याचा अर्थ आहे का? तुमच्या भाषणानंतर मुसलमानांमध्ये असुक्षिततेची भावना आली आहे.  

त्यावर शहा यांनी सांगितले, ‘‘पाकिस्तान, बांगलादेश व अफगाणिस्तानातून आलेल्या हिंदू, बौद्ध, पारशी, शीख व ख्रिश्‍चन धर्मीयांना भारताचे नागरिकत्व मिळेल अशी ही तरतूद आहे. त्या देशात धार्मिक आधारावर होणारा भेदभाव व जुलमामुळे ते भारतात येत आहेत किंवा आले आहेत. ‘एनआरसी’ व नागरिकता विधेयक या वेगवेगळ्या बाबी आहेत हे तुमच्या लक्षात आलेले नाही व तुमचा मुद्दा ‘एनआरसी’शी संबंधित नाही.’’ 

पश्‍चिम बंगालमध्ये ‘एनआरसी’साठी मी कदापि परवानगी देणार नाही. राज्यातील राहणाऱ्यांचे नागरिकत्व कोणीही हिरावू शकणार नाही आणि तुम्हाला कोणीही निर्वासित करू शकणार नाही.
- ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री,  पश्‍चिम बंगाल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com