सॅटेलाईट फोन बाळगल्याने अनिवासी भारतीयाला घेतले ताब्यात

वृत्तसंस्था
शुक्रवार, 30 मार्च 2018

बॅगची तपासणी करताना इरिडियम सॅटेलाईट एलएलसी मॉडेल नं. 9579 या प्रकारचा सॅटेलाईट फोन सापडला. जेव्हा सीआयएसएफच्या अधिकाऱ्यांनी या फोनचा परवाना मागितला तेव्हा नवीन यांच्याकडे परवाना नव्हता.

राजकोट : भुज विमानतळावर अमेरिकेतील अनिवासीय भारतीयाला (NRI) सॅटेलाईट फोन स्वतःजवळ बाळगल्यामुळे ताब्यात घेण्यात आले आहे. नवीन चंद्रा डीमोंड असे त्यांचे नाव असून तो मूळचा गुजरातच्या नवसारी येथील आहे. 

25 लोकांचा समूह कच्छ येथे आला होता. त्यादरम्यान बॅगची तपासणी करताना इरिडियम सॅटेलाईट एलएलसी मॉडेल नं. 9579 या प्रकारचा सॅटेलाईट फोन सापडला. जेव्हा सीआयएसएफच्या अधिकाऱ्यांनी या फोनचा परवाना मागितला तेव्हा नवीन यांच्याकडे परवाना नव्हता. जेव्हा फोन सापडला तेव्हा तो बंद होता. 

नवीन हे कॉलोरॅडो डेन्व्हर येथे एका नामांकीत कंपनीत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करतात. गेली तीस वर्षे ते अमेरिकेत रहात आहेत. सीआयएसएफ अधिकाऱ्यांनी नवीन यांना भुज पोलिसांच्या ताब्यात दिले आहे व अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.  

'आम्ही केंद्रीय गृहमंत्रालयाकडून परवानगी घेऊन नवीन यांची सॅटेलाईट फोन बाळगण्या प्रकरणी तक्रार नोंदवली आहे. या प्रकरणी आमची चौकशी चालू असून, नवीन यांच्यासोबत असणाऱ्या इतरांचीही चौकशी चालू आहे.' असे भुजचे पोलिस अधिकारी एम. एस. भद्रा यांनी सांगितले. 

2008 मध्ये झालेल्या मुंबईतील दहशतवादी हल्ल्यात लष्कर-ए-तैय्यबा या संघटनेने सॅटेलाईट फोनचा वापर केला होता, तेव्हापासून सॅटेलाईट फोन वापरण्यास भारतात बंदी आहे. अशा प्रकारचा फोन कोणत्या प्रवाशाकडे आढळल्यास त्या व्यक्तीला ताब्यात घेतले जावे, असे परिपत्रक विमान सुरक्षा विभागाने 2012 मध्ये जाहीर केले होते. 

Web Title: NRI detained with satellite phone at Bhuj airport